जिल्हा शिक्षण प्रशासनाने शेगांव पं.स.ला पहिली ते आठवीच्या १५ हजार विद्यार्थ्यांकरिता मोफत वाटप करण्यासाठी पाठविलेली एक लाख पुस्तके पावसाच्या पाण्याने चिंब भिजली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे शेगांव पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी पाठविण्यात आलेली मोफत पुस्तके सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे देण्याचे आदेश जिल्हा शिक्षण प्रशासनाने सर्व पं.स.ला दिले आहे. मात्र, या आदेशाची अवहेलना करून एक लाख पुस्तके अहिल्यादेवी होळकर कन्या शाळेच्या खोलीत ठेवण्यात आली. मागील ४ दिवसांपासून शेगांव शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शाळेच्या खोलीत ठेवलेली पुस्तके पावसाने भिजली असल्याचे आज सकाळी दिसून आले. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांना निरोप पाठवून ती पुस्तके घेऊन जाण्याचे कळविण्यात आले.  त्यानुसार काही मुख्याध्यापक ही पुस्तके घेऊन जाण्यास आले असता त्यांना ती पुस्तके ओली झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी ही ओली झालेली पुस्तके घेण्यास नकार दिला. या प्रकरणाची माहिती श्ेागांव पं.स.च्या सभापती मिरगे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली व याप्रकरणी चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. शेगांव पं.स.अंतर्गत एकूण १५ हजार विद्यार्थी आहेत. याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.