लातूर परिमंडलात मागील वर्षी सव्वालाखाच्या आत असणारी ऑनलाइन वीजग्राहकांची संख्या या वर्षी लाखाने वाढली. ही संख्या २ लाख २६ हजार ३६७ असून, या ग्राहकांनी १२ कोटी ८८ लाख रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइनद्वारे केला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मराठवाडाही आता मागे नाही. त्याचीच फलश्रुती ऑनलाइनचा टक्का वाढण्यात झाली. घरबसल्या वीजबिल भरण्याच्या सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यात या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ७१ लाखांच्या आसपास आहे. मराठवाडय़ात ४ लाख ६४ हजार ग्राहक ऑनलाइनद्वारे वीजबिल भरत आहेत. लातूर परिमंडळात हे प्रमाण जास्त आहे. परिमंडळातील तब्बल २ लाख २६ हजार ३६७ ग्राहकांनी १५ कोटी ८८ लाख रुपये वीजबिल ऑनलाइन भरले. गतवर्षी १ लाख ११ हजार ९२० ग्राहकांनी १० कोटी ९ लाख रकमेचा भरणा केला होता. यंदा ग्राहकसंख्या १ लाख १४ हजाराने, तर रक्कम ५ कोटी ७९ लाखांनी वाढली.
मराठवाडय़ात तुलना केल्यास नांदेड परिमंडलात २०१२-१३ मध्ये १ लाख ३७ हजार ७०६ ग्राहक आहेत. त्यांनी १ कोटी ४५ लाखांचा भरणा केला, तर औरंगाबाद परिमंडलात ९९ हजार ग्राहकांकडून ८ कोटी ६६ लाखांचा वीजभरणा झाला. मुंबई, पुण्यात हे प्रमाण काही पटीने अधिक असले, तरी मराठवाडय़ातही ते दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर अगदी सोप्या सूचनांचा वापर करून ग्राहकांना सहज वीजबिल भरता येते. दिवसेंदिवस इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मोबाइलवरही सर्व काही उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा ऑनलाइनद्वारे करावा, असे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता बी. बी. पाटील यांनी केले आहे.