सुरक्षा सप्ताहाची ऐशीतैशी
पाईपलाईन रस्त्यावर अपघात
सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील मोरया मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगातील मारूती स्वीफ्टची दोन मोटारसायकलला धडक बसून एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.
अर्जुन लक्ष्मण दहिफळे असे अपघातात ठार झालेल्या पोलिसाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाईपलाईन रस्त्यावर दोघा मोटारसायकलस्वारांची ‘रेस’ लागली होती. त्यांच्या या बेदरकार मस्तीमुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले व तो दहिफळे यांना जोरात जाऊन धडकला असे प्रत्यक्ष घटनादर्शीनी सांगितले.
दहिफळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. बुधवारी रात्री ते आपल्या दुचाकीवर (एमएच १६ एस ७७९९) जात असताना श्रीराम चौकाकडून भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या स्विफ्ट कारच्या (एमएच १६ एटी ८००७) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने प्रथम त्याने दुभाजकाला धडक दिली व नंतर विरूद्ध दिशेला येऊन समोरून येत असलेल्या दहिफळे यांच्या दुचाकीस जोराची धडक बसली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दहिफळे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारने अन्य एका मोटारसायकलला (एमएच १६ एडब्ल्यू ९५२७) धडक दिल्याने त्यावरील निखील ज्ञानेश्वर गारूडकर व जयप्रकाश नारायण दिवटे हे भिंगारचे तरूण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कारचालक कार सोडून पळून गेला.
याप्रकणी तोफखाना पोलिसांनी निखील गारूडकर यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वळवी करत आहेत.
दहिफळे हे पाथर्डी तालुक्यातील नांदूर निंबादैत्य येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर येथे आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ४४ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार
आहे.