धनेगाव धरणात खूपच अल्प पाणीसाठा असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शहराला आठवडय़ातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येत्या उन्हाळय़ात पिण्यापुरते पाणी मिळावे, या हेतूने आता १ फेब्रुवारीपासून १० दिवसांतून एकदाच पाणी दिले केल जाणार आहे.
धनेगाव धरणात ९.९० दलघमी अचल पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून लातूर शहर, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब शहर, इतर १२ गावे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पाणीपुरवठा केला जातो. मार्चअखेपर्यंत पाणी वितरित करता येईल, एवढेच पाणी धरणात शिल्लक असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. शहरात पाणी वाया जाण्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे नागरिकांनी नळाला मीटर बसवूनच पाणी घ्यावे, असा प्रयत्न केला जाणार आहे. पाण्याची उधळपट्टी कमी केल्याशिवाय लोकांना पाणी पुरणार नाही. तोटय़ांमधून वाया जाणारे पाणी अन्य नागरिकांना उपलब्ध होईल. नागरिकांनी तातडीने मीटर बसवून सहकार्य करण्याचे आवाहनही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केल आहे.
घरोघरी नळाला विद्युतपंप लावून पाणी घेतले जाते. दि. १ फेब्रुवारीनंतर या पद्धतीने पाणी घेणाऱ्यांवर कारवाई करून पंप जप्त केले जाणार आहेत. ज्यांनी अवैध नळजोडणी घेतली, त्यांना १ हजार रुपये भरून तातडीने वैध करून घेण्याचे आवाहनही प्राधिकरणाने केले आहे. शहरातील विविध भागांचे पाणी वितरणाचे वेळापत्रक उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे.