भंडारदरातून जायकवाडीचा वेग मंदावला

भंडारदरा व निळवंडे धरणातून आतापर्यंत जायकवाडीत दोन टीएमसी पाणी पोहचले आहे. पण, आता उरलेले एक टीएमसी पाणी तांत्रिक कारणांमुळे पोहचविणे अवघड बनले असून या पाण्याचा लाभ होण्याऐवजी ते वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास असल्याने त्यावर निर्णय न घेता बघ्याची भूमिका ऐन दुष्काळात घेतली जात आहे.
भंडारदरा, निळवंडे, मुळा, दारणा या धरणातून नऊ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले. आतापर्यंत साडेपाच टीएमसी पाणी पोहचले आहे. जलसंपदा, पोलीस, महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे हे पाणी जायकवाडीपर्यंत गेले, पाण्यात मोठी तूट आली नाही. भंडारदरा व निळवंडेतून तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. त्यापैकी दोन टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. आता निळवंडेतील एक टीएमसी पाणी पोहचणे बाकी आहे. भंडारदराच्या वक्राकार दारातून साडेसहा हजार क्युसेक वेगाने पाणी बाहेर काढता आले, आता ते अशक्य झाले. निळवंडेतून १ हजार ७७५ क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे. निळवंडेला पाणी सोडण्यासाठी एकच दार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढविणे अशक्य बनले आहे. ७० ते ८० टक्के पाणी वाया गेल्यास एक टीएमसी पाण्यापैकी केवळ अडीचशे दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीत पोहचू शकेल. मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया गेल्याने कुणालाही लाभ होणार नाही. तसेच, १५ डिसेंबपर्यंत शेतीसाठी आवर्तन करता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, पालकमंत्री बबनराव पाचपुते, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी निर्णय घ्यायला भाग पाडणे गरजेचे आहे. भर दुष्काळात पाण्याची उधळपट्टी होणे हे सरकारला महाग पडणारे आहे.
निळवंडेतून जायकवाडीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आणखी सव्वाशे ते दीडशे दशलक्ष घनफूट पाणी जादा सोडून प्रवरा नदीपात्रातील चौदा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात दोन फळ्या टाकून पाणी अडविले जाणार आहे. पण, आणखी शंभर ते दीडशे दशलक्ष घनफूट पाणी जादा सोडले तर आणखी एक ते दोन फळ्या टाकणे शक्य होईल. त्यामुळे नदीपात्रात जादा पाणी अडवून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.