शासकीय वसतीगृहातील ‘नरक यातना’
शंभर विद्यार्थ्यांसाठी शौचालयांची संख्या केवळ एक..नादुरूस्त स्नानगृहामुळे सूर्यस्नान करावे लागण्याची वेळ..पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत: करण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती..दिवसा वीज उपकरणे न वापरण्याचा अलिखित नियम..लहानशा फ्लॅटमध्ये १२-१२ विद्यार्थ्यांचा भरणा..
अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्यांमुळे येथील आर्थिकद्दष्टय़ा मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अक्षरश: नरक यातनांचा अनुभव घ्यावा लागत आहे. राज्याच्या शिक्षण खात्यातर्फे संचलित या वसतीगृहात किमान सोयी-सुविधांचा अभाव

पदोपदी जाणवत असून प्रतिकूल वातावरणात विद्यार्थ्यांना मुकाट राहण्याची वेळ आली आहे. या निमित्ताने राज्य शिक्षण संचालनालयाच्या इच्छाशक्तीचेही ‘मागासलेपण’ अधोरेखित होत आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय रस्त्यावरील भाडय़ाच्या जागेवर हे वसतीगृह असून यंदा त्यात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात ओला आहे. ही इमारत बरीच जुनी असल्याने तिची दुरूस्ती करण्याची नितांत गरज आहे. अशी दुरूस्ती तर दूरच पण साधी देखभालही करण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागा मालकाला मंजूर झालेले वाढीव जागा भाडे दोन वर्षांपासून नियमित दिले जात असले तरी तत्पूर्वीच्या १२३ महिन्यांचा वाढीव भाडय़ाचा जवळपास साडे आठ लाखांचा फरक दीर्घकाळापासून थकीत आहे. थकबाकी मिळाल्यानंतरच देखभाल दुरूस्ती करण्याची ताठर भूमिका जागामालकाने घेतली आहे. थकबाकी देण्याचे उत्तरदायित्व असलेल्या शिक्षण संचालक कार्यालयानेही या संबंधी अक्षम्य बेपर्वाई दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.
शंभर विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शौचालय असणे ही कल्पनाच अत्यंत अतार्किक असली तरी येथे तेच वास्तव आहे. इमारतीच्या एकूण १२ पैकी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील आठ फ्लॅटमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. सर्व आठ फ्लॅटमधील शौचालयांचा वापर दुरूस्ती होत नसल्याने वापर बंद आहे. तळमजल्यावरील चारपैकी तीन फ्लॅट हे गृहपाल खोली व भांडारगृह म्हणून वापरात आहेत. उर्वरित एका फ्लॅटमधील शौचालयाचाच वापर या सर्व विद्यार्थ्यांना करावा लागतो. अशावेळी साहजिकच गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. परिणामी बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा, महाविद्यालय गाठणे शक्य होत नाही. स्नानगृहांची देखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे बाहेर उघडय़ावर स्नान करावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा शेजारच्या इमारतींमधील रहिवाशांची नाराजी सहन करावी लागते. (पूर्वार्ध)