तालुक्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली गारपीट आणि बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकांबरोबरच कांदा पिकाचे आणि ज्या कांद्याच्या डोंगळ्यांपासून बियाणे निर्माण होते ते डोंगळे पूर्णपणे भुईसपाट झाल्याने आता पोळ, लाल (रांगडे) आणि उन्हाळ कांदा लावण्यासाठी बियाणे आणायचे तरी कुठून, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पूवरेत्तर भागातील ४० ते ४२ गावांना फटका बसल्याची शासकीय दरबारी नोंद असली तरी कांदा उत्पादन घेणाऱ्या बहुतांश गावांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. गारपिटींनंतर १५ गावांमध्ये शेतकऱ्यांनी जेव्हा शेतातील कांदा काढण्यास सुरूवात केली तेव्हा वरून चांगला दिसणारा कांदा आतून सडल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यामुळे एक वेगळेच संकट त्यांच्यापुढे उभे राहिले. हजारो एकर कांदा सडल्याने व त्याच्या लागवडीवर झालेला खर्चही वाया गेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला. कांद्याबरोबरच बियाणांसाठी खास राखून ठेवण्यात आलेल्या डोंगळ्यांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे बियाणे आणणार कुठून, अशी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. बऱ्याचदा कांदा बियाण्याची गरज स्वत: डोंगळे लावून शेतकरी भागवितात. बी कमी पडल्यास नातेवाईकांकडून उसनवारीने घेतले जाते. यावर्षी मात्र गारपिटीमुळे सर्वच पोळले गेल्याने बियाणे मिळणे मुश्किल झाले आहे. बाजारात कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असले तरी या बियाण्यांपासून कांद्याचे योग्य उत्पन्न मिळेलच याची खात्री कोणीच देत नसल्याने शेतकरी बाजारातील बियाण्यांऐवजी स्वत:च बियाणे तयार करणे पसंत करतात. मात्र गारपिटीने यावर्षी ती संधीही गेली आहे.
लासलगाव, येवला, चांदवड भागातील कांद्याला देशभरात विशेष मागणी असते. प्रतही उत्कृष्ट आणि खवय्यांसाठी हवी ती चव मिळत असल्याने या भागातील कांद्याला दरही चांगला मिळतो. एक एकर कांदा लागवडीसाठी चार ते पाच हजार रूपयांच्या बियाणांची गरज भासते. मात्र आता या परिसरातील गावांमधून बियाणेच मिळेनासे झाले आहे. नेहमीपेक्षा अधिक दर देऊनही बियाणे मिळत नसल्याने बहुतेकांना कांदा लागवडीवर यावर्षी पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत.