घटलेली आवक, बदलते हवामान, नवीन उत्पादनाला लागणारा अद्याप एक महिन्याचा मुहूर्त, घसरलेली पतवारी यामुळे कांद्याने घाऊक बाजारात किमतीच्या बाबतीत पन्नासी गाठली आहे. किरकोळ बाजारात हा दर साठी गाठण्याइतपत गेला आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर उपाय म्हणून इजिप्त, इराकमधून सुमारे १०० कंटेनर कांदा आयात केला जाणार असून ही आवक म्हणजे इतक्या मोठय़ा देशातील ग्राहकांसाठी दरिया में खसखस या प्रकारातील राहणार आहे. भाववाढीमुळे ऐन श्रावणात सर्वसामान्य गृहिणीची डोळ्यांत कांद्याने पाणी आणले असले तर पुढील महिन्यात येणारा गणेशोस्तव किमतीचे हे विघ्न हरण करणार असून सप्टेंबर महिन्यात येणारा नवीन कांदा ही दरवाढ नियंत्रणात ठेवण्यास मदत करणार असल्याचे चित्र आहे.

मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राला कांदापुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील कांद्याच्या घाऊक बाजारपेठेत सोमवारी १०५ ट्रक टेम्पो भरून कांदा आल्याची नोंद आहे. रविवारी बाजार बंद असल्याने सोमवारी ही आवक वाढण्याची अपेक्षा होती पण ती फार मोठय़ा प्रमाणात न वाढल्याने कांद्याने घाऊक बाजारात ४५ ते ५० रुपये प्रति किलोची उसळी घेतली. तोच कांदा मुंबईत गेल्यानंतर ६० रुपये किलोने विकला गेला तर काही उच्चभ्रू लोकवस्तीत चांगल्या प्रतीचा कांद्याने ६५ रुपये भाव खाल्ला. त्यामुळे कांदा येत्या एक महिन्यात शंभरीच्या दिशेने वाटचाल करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या या भाववाढीवर उतारा म्हणून केंद्र सरकारने आयातदारांना कांद्याची आयात करण्याची परवानगी दिली आहे. १०० कंटेनर आठ दिवसांपूर्वी इजिप्त व इराक येथून निघाले आहेत. लवकरच हे कांदे उरण येथे जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे आणले जाणार आहेत. तुर्भे येथील बाजार त्याची विक्रीसाठी वाट पाहत आहेत. कांद्याच्या भाववाढीवर केंद्र सरकारने हा उपाय शोधला असून पुढील महिन्यात १५ ते २० सप्टेंबपर्यंत नवीन कांद्याचे उत्पादन येण्याची शक्यता कांदा व्यापारी अशोक वाळुंज यांनी व्यक्त केली. बाजारात येणाऱ्या कांद्याची प्रतवारी कमी असल्याने चांगल्या कांद्याची भाववाढ झाली आहे. नाशिक व पुण्यातील काही शेतकरी चांगला भाव येण्याची वाट पाहत असून बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव साठी पार करणार नाहीत, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते.