अतिवृष्टीमुळे कांद्याची झालेली नासाडी आणि निर्यातीमुळे मुख्य बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये कांद्याच्या किंमतीमध्ये तिप्पट वाढ  झाली आहे. एरवी बाजारात दररोज २० ते २५ ट्रक येणारा कांदा आता फक्त एक ते दोन ट्रक येऊ लागल्याने कांदा विक्रेत्यासह सामान्य नागरिक या महागाईने त्रस्त झाला आहे. कांद्याची कमी झालेली आवक आणि महागाईमुळे रोजच्या जेवणातून कांदा नाहिसा होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून कांद्याचे भाव सतत चढतीवर आहेत. १०० रुपयावर गेलेला कांदा गेल्या महिन्यात ५० रुपयापर्यंत आला होता मात्र पुन्हा एकदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारपेठेत ७० ते ८० रुपयापर्यंत कांदा पोहचला आहे. कळमना बाजारपेठेतील कळमना मार्केटमधील कांदा व्यापारी भावेश वासानी यांनी सांगितले, यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात कांदा खराब झाला आहे त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे विदर्भात येणारा मालाची आवक थांबली आहे. विदर्भात पांढरा कांद्याची आवक कमी असली तरी आंध्रप्रदेश , कर्नाटक, बेलगाम या भागातून लाल कांदा मात्र येत आहे मात्र त्याची फारशी विक्री नाही.
पांढऱ्या कांद्याची मागणी जास्त असली तरी तो पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. कळमना मार्केटमध्ये चाळीसगाव, बाळापूर, खामगाव या भागातून कांद्याची आवक होत असते मात्र गेल्या आठ दिवसांपासून ती कमी झाली आहे. दररोज २० ते २५ गाडय़ा कळमना मार्केटमध्ये येत असताना गेल्या दोन दिवसांपासून बाळापूर, खामगाव आणि चाळीसगाव या भागात केवळ एक ते दोन गाडय़ा येत आहेत. कांद्याची मागणी प्रमाणे आवक कमी झाली आहे. त्यामुळे काद्यांचे भाव वाढविण्याशिवाय व्यापारांजवळ पर्याय नाही.
ठोक बाजारपेठेत पांढरा कांदा २२०० ते २३०० रुपयाला आणि लाल कांदा १९०० ते २००० रुपये (४० किलो) विकला जात आहे. चिल्लर बाजारपेठेत पूर्वी २० ते २५ रुपये किलो प्रमाणे विकणारा कांदा आता ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. विदर्भात बहुतांश भागात पांढरा कांदा वापरला जात असला तरी लाल कांद्याला  मागणी आहे मात्र नाशिकची बाजारपेठेतून गेल्या सात दिवसापासून लाल कांद्याची आवक कमी झाली आहे.
ज्या व्यापारांनी माल साठवून ठेवला होता त्यांच्याकडे पांढरा कांदा उपलब्ध आहे. कांद्याच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी अशीच परिस्थिती कायम राहिली तर सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे हे मात्र निश्चित.