गेल्या वर्षभरापासून पन्नाशीच्या आसपास रेंगाळणाऱ्या कांद्याचे घाऊक दर यंदा प्रथमच दहा रुपयांपेक्षा खाली उतरले असून वाशीतील कृषी मालाच्या घाऊक बाजारपेठेत उत्तम प्रतीचा कांदा मंगळवारी आठ ते १४ रुपयांनी विक्रीसाठी उपलब्ध होता. घाऊक दरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर घसरण झाल्यामुळे किरकोळ बाजारातील किमती आता स्थिरावू लागल्या असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत उत्तम प्रतीचा कांदा २० ते २२ रुपये किलो या दराने विकला जाऊ लागला आहे. वर्षभरात प्रथमच कांद्याचे दर पूर्ववत झाल्याचे हे संकेत आहेत.
गेल्या मे महिन्यापासून कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. साधारणपणे जून आणि जुलै महिन्याच्या मध्यावर कांद्याचे दर वधारतात, असा अनुभव आहे. यंदा मात्र महागाईचा हा हंगाम वर्षभर कायम राहिला. अवेळी आलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे अपरिमित असे नुकसान झाल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी जुलै महिन्यापासून कांद्याचे दर चढेच ठेवले. वाशीतील घाऊक बाजारातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरास कृषिमालाचा पुरवठा केला जातो. मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना प्रत्येक दिवशी सरासरी १०० गाडी कांद्याची गरज लागते. इतकी आवक झाली की कांद्याचे दर स्थिर राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. मुंबईतील हॉटेल मालकांना दररोज सरासरी ६० गाडी कांदा लागतो. असे असताना गेल्या वर्षभरापासून कांद्याची आवक ७० ते ८० गाडय़ांच्या आसपास असल्यामुळे दरही वधारले होते. कांद्याचे नवे पीक बाजारात आल्यानंतर ही परिस्थिती सुधारेल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. ऑक्टोबर महिन्यात नवे पीक आल्यानंतरही कांद्याचे घाऊक दर पन्नाशीच्या आसपास होते. त्यामुळे किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ७० ते ८० रुपयांनी विकला जात होता. गेल्या दोन आठवडय़ांपासून ही परिस्थिती बदलू लागली असून नाशिक जिल्ह्य़ातून होणारी कांद्याची आवक दुपटीने वाढल्याने १४ दिवसांमध्ये कांद्याचे घाऊक दर किलोमागे ३० रुपयांनी खाली उतरले आहेत, अशी माहिती कांदा बाजारातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मंगळवारी कांदा बाजारातील दर किलोमागे आठ ते १४ रुपये असे होते. चांगल्या प्रतीचा कांदा काहीसा ओलसर असल्याच्या तक्रारी असल्या तरी दर पूर्ववत झाल्याने किरकोळ बाजारातही त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मुंबई, ठाण्याच्या बाजारात किरकोळीचा कांदा २० रुपयांनी मिळू लागला आहे. येत्या दिवसात यामध्ये आणखी घट होईल, असा दावा व्यापारी करत आहेत.