मागील आठवडय़ात १६०० रुपये प्रति क्विंटल असणारे कांद्याचे दर सध्या ११०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काही कांद्याला तर १०० रुपये क्विंटलपेक्षा कमी भाव मिळाला आहे. चाळीतील साठविलेला कांदा खराब होऊ लागल्याने तो मोठय़ा प्रमाणात बाजारात आणला जात आहे. आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी तो कमी भावात खरेदी करण्याचे धोरण ठेवले आहे. या पाश्र्वभूमीवर, येत्या दोन दिवसांत कांदा दरात सुधारणा न झाल्यास २७ मे रोजी रास्ता रोकोचा इशारा राष्ट्र सेवा दल प्रणीत शेतकरी पंचायतीने दिला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने येवले तालुक्यातील कांदा, फळबागा व इतर पिके भुईसपाट झाली आहेत. त्यातही ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड जानेवारी महिन्यातील होती, त्यांचे कांदे कसेबसे बचावले होते, मात्र गारपिटीनंतर निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे तो कांदाही बाधित झाला. असा बाधित हजारो क्विंटल कांदा शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला, तर हलक्या प्रतीचा काही माल चाळीमध्ये साठविण्यात आला. लग्नसराईचे दिवस असल्याने त्यातील कांदा बाजारपेठेत आणला आहे. या स्थितीत भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवडय़ात या कांद्याला येवल्यासह इतर बाजारांत ९०० ते १७०० रुपयांपर्यंत भाव होते. त्या वेळी येवला बाजार समितीत तीन ते साडेतीन हजार क्विंटल आवक होती. आता आवक वाढली आहे. कारण, चाळीत साठविलेला काही कांदा सडू लागल्याचे लक्षात आल्याने घाबरलेले शेतकरी तो विक्रीसाठी आणत आहे. परिणामी, सहा ते साडेसहा हजार क्विंटलपर्यंत आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी या काद्यांबद्दल धास्ती घेतली. यामुळे भाव एकदम खाली आल्याचे बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने तुटपुंजी मदत देऊन हात वर केले. या स्थितीत शेतकरी सर्व बाजूंनी संकटात सापडला आहे. कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटल न झाल्यास मंगळवारी पेट्रोलपंपावरील चौफुलीवर रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकरी पंचायतीचे अविनाश दुघड, बाबासाहेब शिंदे आदींनी दिला आहे.