राज्य शासनाच्या निर्देशानुसार अकरावी प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाइन’ पध्दतीने होणार असल्याने शैक्षणिक संस्थांच्या अर्ज विक्रीतून होणाऱ्या नफेखोरीला आळा बसला आहे. तसेच, प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविली जाणार असल्याने राजकीय हस्तक्षेपासह अन्य काही घटकांवर नियंत्रण येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी गर्दी पाहता महाविद्यालयीन व्यवस्थापनाने खास व्यवस्था केली आहे. दरम्यान, शिक्षण उपसंचालक विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
एरवी दहावीचा निकाल लागल्यानंतर आपल्या आवडत्या महाविद्यालयात अकरावीचा प्रवेश व्हावा यासाठी पालकांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन-तीन महाविद्यालयांत प्रवेश अर्ज भरले जात होते. या स्थितीचा फायदा घेत महाविद्यालये प्रवेश अर्ज विक्रीतून बरीच रक्कम संकलीत करीत. काही महाविद्यालयांकडून प्रवेश क्षमतेच्या तिप्पट प्रमाणात अर्जाची विक्री होत असे. या नफेखोरी वृत्तीला प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे चाप बसला आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी शुल्क भरावे लागणार नाही. अर्ज महाविद्यालयात सादर केल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे नांव यादीत असेल, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज दिला जाणार आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया सुकर झाली आहे. बहुतांश महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली असली तरी काही महाविद्यालये मात्र त्यास अपवाद आहेत. सोमवारी अर्ज खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता त्यांनी शाखानिहाय अर्ज विक्रीची विशेष व्यवस्था केली. यामध्ये मुले तसेच मुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था करून देताना अर्ज भरतांना विद्यार्थी किंवा पालकांना काही अडचण होऊ नये यासाठी काही ज्येष्ठांची तसेच स्वयंसेवकांची नेमणूक केली. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून महाविद्यालयांनी खासगी सुरक्षा रक्षकांची संख्याही वाढविली आहे. दहावी निकालाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला असल्याची भिती पालक-शिक्षकतज्ज्ञांनी व्यक्त केली.
शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या नियमावलीनुसार, १५ ते १८ जून कालावधीत प्रवेश अर्ज वितरण व स्वीकृती होईल. १८ ते २२ जून या कालावधीत अर्ज छाननी व यादी तयार करणे, २२ जून रोजी सायंकाळी चार वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांंना २२ ते २५ जून या कालावधीत प्रवेश देण्यात येईल. पुढील टप्पात ३० जूनपर्यंत रिक्त जागांवर प्रवेश सुरू राहणार असून उर्वरीत जागांसाठी गुणवत्ता यादी तयार करून ७ जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.