गेल्या महिन्यात महावितरणने ग्राहक मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करत असल्याचा दावा केला होता. पण, एप्रिल महिन्याचे देयक अदा करण्यासाठी ग्राहकांचा डाटाच अपडेट नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या संबंधीच्या तक्रारी ‘लोकसत्ता’कडे केल्या. ऑनलाईन देयक अदा केल्यानंतर मिळणारी सुट व देयक उशिराने भरल्याचा दंड अशा दुहेरी संकटात ग्राहक सापडला आहे.
गेल्या महिन्यात महावितरण कंपनीने मोठा गाजावाजा करत तेरा परिमंडळातील ७१ लाख ग्राहक ऑनलाईन देयक भरत असल्याचा दावा केला होता. या महिन्यात ग्राहकांना एप्रिल महिन्याचे देयक प्राप्त झाले. हे देयक अदा करण्यासाठीचा कालावधी येत्या काही दिवसात संपेल. पण, जे ग्राहक ऑनलाईन देयक अदा करतात त्याच्यासाठी ही सोय आता अडचण झाली आहे. कारण, ग्राहकांनी मार्च महिन्याचे देयक जे एप्रिल महिन्यात अदा केले ते अजून संकेतस्थळावर कायम आहे. त्यामुळे मे महिन्यात प्राप्त एप्रिल महिन्याचे देयक अदा करण्यात मोठी अडचण होत आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात प्राप्त देयकाची माहिती ऑनलाईन उपलब्ध नाही, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर असलेल्या चालू देयक अदा करण्याच्या ठिकाणी भेट दिल्यावर याची प्रचिती येते. मे महिन्यातील वाढते तापमान पाहता रांगेत वीज देयक भरणे हे अडचणीचे ठरत असल्याने ग्राहक ऑनलाईन देयक भरणे पसंत करतात. पण, महावितरणचा डाटा अपडेट नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.  
या महिन्यात विहित मुदतीच्या आत ऑनलाईन देयक अदा केल्यानंतर ग्राहकांना मिळणारे प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काऊंट यामुळे मिळणार नसल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच जे ग्राहक विहीत मुदतीच्या आत हे देयक अदा करणार नाहीत त्यांना अतिरिक्त दंड भरावा लागेल. महावितरण कंपनीने निर्माण केलेली सुविधा केवळ डाटा अपडेट नसल्याने ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारचा फटका यामुळे ग्राहकांना बसत आहे. या संदर्भात महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.