अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ई-नाटय़शोध’ या नावाने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे. स्पर्धेचे खास वैशिष्टय़ म्हणजे स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपल्या एकांकिकेची ध्वनिचित्रफीत सादर करायची आहे. संपूर्ण स्पर्धा ऑनलाइन होणार आहे.
विविध एकांकिका स्पर्धामधून व्यावसायिक रंगभूमीला अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मिळाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात युवा कलाकार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठय़ा संख्येने या स्पर्धामध्ये सहभागी होत असतात. मात्र या सर्व एकांकिकांचे दस्तऐवजीकरण होत नाही आणि ते करण्याच्या मुख्य उद्देशाने ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात येत आहे.
मराठी, हिंदूी, इंग्रजी, गुजराती अशा चार भाषांमध्ये ही ऑनलाइन एकांकिका स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. स्पर्धकांनी ध्वनिचित्रमुद्रित केलेल्या एकांकिकेची ध्वनिचित्रफीत व संहितेची एक प्रत स्पर्धेसाठी सादर करायची आहे. एकांकिका स्पर्धा ऑनलाइन असल्याने नेटप्रेक्षक पसंतीचे पारितोषिकही असणार आहे. मान्यवर परीक्षकांची समिती परीक्षक म्हणून काम पाहणार असून विजेत्या ठरणाऱ्या एकांकिकेचा रंगमंचीय प्रयोग ‘अस्तित्व’तर्फे सादर केला जाणार आहे.
स्पर्धेसाठी एकांकिका सादर करण्याची शेवटची तारीख २ मे २०१५ अशी असून http://www.enatyashodh.comया संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती मिळणार आहे.