इच्छुक उमेदवारांना अचानक ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितल्याने आरक्षक भरतीसाठी आलेल्या शेकडो महिलांनी संतप्तपणे ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.
ठाणे महापालिकेत खुल्या वर्गातील आरक्षक भरतीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून दोनशे महिला बुधवारी दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये जमल्या होत्या. मात्र ऑनलाइन अर्ज भरल्याशिवाय चाचणी घेण्यात येणार नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतल्याने या महिलांनी आंदोलन केले. ग्रामीण भागात ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधाच नाही. मग आम्ही करायचे काय, असा त्यांचा सवाल आहे.
ठाणे महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर आरक्षक भरती होत आहे. गेल्या वेळी सरळ भरतीच्या वेळी सुमारे १५ हजार उमेदवार उपस्थित राहिल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार बुधवारी आरक्षक भरतीसाठी आलेल्या महिलांची चाचणी न घेता त्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र ऑनलाइन प्रक्रियेविषयी आधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती, असा दावा करून या महिलांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. ऑनलाइन भरतीची मुदत वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.