टंचाईत पाणीकपातीचा आदेश निघाला आणि त्याची लगोलग अंमलबजावणी झाली. परंतु आठवडय़ातून केवळ ४० मिनिटेच नळाने पाणी मिळते. हे पाणी प्यावयासही पुरत नाही, तेथे अन्य वापराचे काय, या प्रश्नात लातूरजवळील बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीची परवड सुरू आहे. मुंबई, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून ६४९ प्रशिक्षणार्थी, तसेच सुमारे १५० कर्मचारी या केंद्रात वास्तव्यास आहेत.
सात वर्षांपूर्वी (सन २००६) दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने बाभळगावजवळील पोलीस मुख्यालयाजवळील जागेत पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. यंदा आठव्या बॅचमध्ये ६४९ प्रशिक्षणार्थी या केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. त्यात नवी मुंबई, बृहन्मुंबई, मुंबई, नाशिक, गडचिरोली येथील प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. केंद्रासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पाणी मिळत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीकपातीचा आदेश काढल्यानंतर आठवडय़ातून केवळ ४० मिनिटेच नळाला पाणी येते. हे पाणी पिण्यासही पुरत नाही. ६४९ प्रशिक्षणार्थी व सुमारे १५० कर्मचारी यांच्यासाठी दररोज टँकरने पाणी आणले जाते. मिळेल तेथून पाणी विकत घ्यावे लागते. आणलेले पाणी प्रशिक्षणार्थीनी बादलीत घेऊनच वापरले पाहिजे, त्यामुळे कसेबसे दैनंदिन वापराला पुरते. दिवसभर मैदानावर घाम गाळावा लागतो. साहजिकच दररोज दोन वेळा घामाने अंघोळ होते. अंघोळीस पाणीच मिळत नसल्यामुळे घामेजून गेलेल्या शरीराला ताजे टवटवीत ठेवण्यासाठी बॉडी स्प्रेचा वापर करण्याशिवाय प्रशिक्षणार्थीपुढे पर्याय नसतो. चार दिवसांतून एकदाच अंघोळीची संधी मिळाली, तर तोही आनंदाचा भाग मानावा लागतो. पोलीस खात्यात करडय़ा शिस्तीला महत्त्व. त्यामुळे वरिष्ठांकडे तक्रारही करता येत नाही व सुविधा मिळत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे.
केंद्राचे प्राचार्य नीलेश आष्टेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाण्याची अडचण असल्याचे मान्य केले. केंद्रात विंधनविहीर नाही. जिल्हा प्रशासनाकडे विंधनविहिरीचा प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १६.१७ हेक्टर क्षेत्रावर हे केंद्र उभे आहे. विलासराव मुख्यमंत्री असेपर्यंत या केंद्रासाठी निधी कमी पडला नाही. मात्र, त्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर व त्यांच्या निधनानंतर या केंद्राक डे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. केंद्रास प्रशासकीय इमारत नाही. शस्त्रागार नाही. दवाखाना नाही. वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स नाहीत असा सर्व नन्नाचा पाढा आहे.
संपूर्ण मराठवाडय़ातच पाणीप्रश्न भेडसावत आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियोजन केले जाते. एवढय़ा मोठय़ा संख्येने प्रशिक्षणार्थी असताना त्यांच्या भोजन, चहापाणी, पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी यासाठी कायमस्वरूपीचा विचारच केला गेला नाही. हे केंद्र कार्यक्षम चालायचे असेल, तर किमान गरजेपुरत्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली पाहिजे. सध्या मात्र प्रशिक्षणार्थीना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
‘गडकरीं’ची कैफियत
केंद्रात २८ पोलीस उपअधीक्षक कार्यरत आहेत. केंद्रात वास्तव्यास जागा नसल्याने शहरातील लॉजमध्ये १५ अधिकारी राहतात. लॉजचे नाव शिवनेरी. सर्व अधिकारी ‘आम्ही गडावर राहतो’ असे सांगतात. हे १५ ‘गडकरी’ खांद्यावर तीन स्टार लावून वाहनाची सुविधा नसल्यामुळे शहर रिक्षाने रोज आठ किलोमीटर ये-जा करतात.