सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागात आतापर्यंत केवळ ४२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आल्याचा दावा शिक्षण मंडळाने केला असला तरी प्रत्यक्षात ही संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळाने ५९ पथके तयार केली असली तरी प्रत्यक्षात मात्र काही निवडक पथकेच परीक्षा केंद्रांवर जात असल्याची माहिती आहे.
या परीक्षेचे मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी, विज्ञान, अर्थशास्त्र विषयांचे पेपर झाले असताना नागपूरसह वर्धा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्य़ात केवळ ४२ कॉपीबहाद्दर पकडण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मराठीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी एकटय़ा गोंदिया जिल्ह्य़ात १७ कॉपीबहाद्दर पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळातर्फे शाळा-महाविद्यालयात जनजागृती केली जात असून त्यासाठी काही शिक्षकांची नियुक्ती केली जाते. गेल्या दोन वर्षांत कॉपीसंदर्भात मंडळाने अधिक कडक धोरण केले असून एका वर्गात पाचपेक्षा अधिक मुले कॉपी करताना सापडली तर शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विविध जिल्ह्य़ात भरारी पथके पाठविण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र काही जिल्ह्य़ातील संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके पोहचतच नसल्याची माहिती समोर आली आहे. एरवी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्य़ातील संवेदनशील केंद्रांची यादी जाहीर करून त्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याचे आदेश दिले जातात. मात्र, यावेळी अशी कुठलीच माहिती मंडळाने प्रसार माध्यमांना दिली नाही. मंडळाने बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी ५९ भरारी पथके नियुक्त केली असून त्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे ६, प्राथमिक विभागाचे ६, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण विभागाचे ६, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ६, प्राचार्य ६, अधिव्याख्याता (ज्येष्ठ) ५, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे १, सहायक शिक्षण संचालक विभागाचे १, राज्य विज्ञान शिक्षणसंस्थाचे १, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन विभागाचे १, जिल्हाधिकारी कार्यालयाचे ६, विभागीय आयुक्त कार्यालयाचे १ आणि मंडळ सदस्य राज्य मंडळ सदस्य १३, अशाप्रकारे ५९ पथके तयार करण्यात आलेली असताना यातील अनेक पथके केंद्रांवर भेटी देत नसल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात शिक्षण मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण म्हणाले, याबाबत जनजागृती करण्यात आल्यानंतर कॉपीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मंडळाने विविध जिल्ह्य़ात भरारी पथके नियुक्त केली आहेत. मंडळातर्फे प्रसार माध्यमांना कॉपीची माहिती देऊ नये, यासंदर्भात कुठलेच धोरण नाही. कॉपी रोखण्यासाठी मंडळाने व्यवस्था केली होती. त्याउपरही काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.