जिल्ह्य़ातील एकूण ९ लाख ८१ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे, परंतु त्यापैकी केवळ ९१ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सुविधा उपलब्ध असून इतर क्षेत्र नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. याचा फटका जिल्ह्य़ातील शेती उत्पादनाला बसत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्य़ात सिंचनासाठी २ मोठे प्रकल्प असून ११ मध्यम, ६६ लघु प्रकल्प, १७१ छोटे तलाव व ६६ हजार ६४ विहिरी आहेत. यातून गेल्यावर्षी केवळ १ लाख ८० हजार ७० हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्य़ात लागवडीखालील एकूण क्षेत्र ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर आहे.
कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ६९ हजार १४५ हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. यात ठिबक व तुषार सिंचनाची फार मोठी भूमिका राहणार आहे. गेल्यावर्षी जिल्ह्य़ात ठिबक व तुषार सिंचनासाठी एकूण २ कोटी ५१ लाख १७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये नागपूर तालुक्यात २१.४९ लाख, सावनेर १२.९५, काटोल ६६.६९,
नरखेड ६९.०९, कामठी २.३९, हिंगणा १४.७०, कळमेश्वर ४१.६३, पारशिवनी ३.८०, रामटेक ७.४७, उमरेड ७.३०, मौदा ००, कुही १.३७ व भिवापूर तालुक्यात २.२९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. यामधून ४६०.९९ हेक्टरमध्ये ठिबक तर ६५१.१४ हेक्टर क्षेत्रात तुषार सिंचनाची सोय करण्यात आली आहे.
याशिवाय २०१४-१५ मध्ये जिल्ह्य़ात ७ कोटी ४५ लाख १९ हजार रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी नागपूर तालुक्यात ३९.८८, कामठी ११.४७, हिंगणा ९५.०७, सावनेर ५३.५७, काटोल १४८.२८, नरखेड ९९.४७, कळमेश्वर ३४.५०, रामटेक २०.४५, पारशिवनी २४.३०, मौदा ४४.५४, उमरेड ७४.०६, भिवापूर ८६.९८ व कुही तालुक्यात १२.६२ लाख रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे.