राष्ट्रीय महामार्गावरील पथकराचे वाढलेले दर आणि या मार्गावरील असुविधा, खराब रस्ते यात भरडले जाणारे वाहनधारक व रस्त्यालगतचे शेतकरी याबाबत रस्ते विकास महामंडळाने पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात दुस-यांदा चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. आश्वासने दिली गेली आणि पुढच्या बैठकीची तारीख देऊन उपस्थितांची बोळवण करण्यात आली.     
दर्जाहीन रस्ते, पाण्याच्या निचऱ्याचा अभाव, जमिनी नापीक होण्याबाबत तज्ज्ञांचा अहवाल, सेवा रस्ते, भुयारी मार्ग या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करता रस्ते विकास मंडळाने पूर्वसूचना न देता सातव्यांदा पथकरात या महिन्यापासून वाढ केली आहे. यावर शिवसेनेव्यतिरिक्त कोणत्याही संघटनेने आवाज उठवलेला नाही. शिवसेनेला आंदोलनपूर्व बैठकीला बोलविण्यात आले. मात्र अपुरे ज्ञानाचे सोंग घेऊन रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. दुसरी बैठक टोप येथील कार्यालयात झाली. त्यातही चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आणि १० ऑगस्टची नवी तारीख देण्यात आली.     
किणी व तासवडे टोलनाका कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे वर्षांनुवर्षे आहे. वाठार चौकात थोडय़ा पावसानेही तळे साचते. कर्नाटकात कमी टोल आकारला जात असल्याबद्दल विचारले असता तो रस्ता केंद्र शासनाच्या विशेष निधीतून झाल्याचे सांगून येथील अधिकाऱ्यांनी अनेक दिवसांनंतर याबाबत हा जावईशोध लावला आहे. निदान किणी टोलनाका ज्या हातकणंगले विधानसभा व लोकसभा मतदारसंघात येतो त्या आमदार-खासदारांनी गांभीर्यपूर्वक येथील प्रश्न सोडवून वाहतूकदार, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.