मराठवाडय़ासाठी जायकवाडी प्रकल्पाला दारण धरणातून फक्त दीड टीएमसीच पाणी द्यावे, त्यापेक्षा जादा पाणी दिल्यास नगर-नाशिक जिल्ह्य़ातील शेतीची वाताहात होईल अशी भीती माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात श्री. शंकरराव कोल्हे यांनी म्हटले आहे, की अवर्षणग्रस्त तालुक्यांना शाश्वत पाणी मिळावे या उद्देशांने ब्रिटिशांनी दारणा व गंगापूर धरणं बांधली. त्यातून येथील शेती फुलविण्यात आली. त्यावर असंख्य छोटेमोठे उद्योगधंदे उभे राहिले मात्र चालू हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. दुष्काळाच्या झळा जानेवारी २०१२ पासूनच जाणवत होत्या. २९ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या बैठकीतही आपण याबाबत माहिती दिलेली आहे. शेतक ऱ्यांच्या हातून खरिपाची पिके गेली. आता रब्बी पिकांनाही गेल्या १३५ दिवसांपासून पाणी दिलेले नाही. त्यामुळे शेतक ऱ्यापुढे आत्महत्या करण्यावाचून कुठलाही पर्याय उरलेला नाही.
जायकवाडी प्रकल्पाला पाणी कमी पडते. ही निकड आजची नाही ती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र त्यासाठी वैतरणेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी या भागात वळविणे हाच एकमेव पर्याय होता. त्यावर आपण गेल्या ५० वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र त्याची परिपूर्ती झालेली नाही. येथील शेती उद्योगाला वंचित ठेवून जायकवाडीला दारणेतून ३ टीएमसी पाणी दिले तर या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. जशी मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्यांची टंचाई आहे, तशीच टंचाई आजही या भागातही आहे. तेव्हा शासनाने या परिस्थितीचा अभ्यास करून जायकवाडी प्रकल्पासाठी फक्त दीड टीएमसी पाणी द्यावे. उर्वरित दीड टीएमसी पाण्यात तत्काळ शेतीचे आर्वतन घ्यावे तरच शेतकरी थोडय़ाफार प्रमाणात जगेल अन्यथा त्याने घेतलेले कर्जफेड करणे अवघड होईल.