सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटंट (सीए) परीक्षेत नगरचा टक्का यंदा कमालीचा घसरला. अंतिम परीक्षेत नगर केंद्राचा निकाल जेमतेम दोन टक्क्यांवर लागला. १२५ पैकी अवघे ३ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रवेश परीक्षेचा निकाल २५ टक्के लागला.
नगर केंद्रावरील चेतन लढ्ढा, सनीत मुथा आणि श्रीनिवास म्याना हे तिघेच सीएची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित तब्बल १२२ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले. प्रवेश परीक्षेला यंदा ३५० विद्यार्थी बसले होते. त्यातील ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किमया गुंदेचा ही २०० पैकी १५० गुण मिळवून नगर केंद्रात पहिली आली. चार्टर्ड अकौंटंट इन्स्टिटय़ूटच्या (आयसीएआय) नगर शाखेचे अध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष अजय मुथा, माजी अध्यक्ष विजय मर्दा यांनी या सर्व उत्तीर्णाचे अभिनंदन केले.
सीएच्या निकालाने यंदा अनेकांना धक्का दिला आहे. राष्ट्रीय पातळीवर हा निकाल ३ टक्केच आहे. नगर केंद्राचा निकाल त्यापेक्षाही कमी लागला. मागच्या दोन वर्षांत या परीक्षेतील यशस्वीतेचा टक्का कमालीचा वाढला होता. गेल्या मे मध्ये झालेल्या परीक्षेत नगर केंद्राचा निकाल १३ टक्के लागला होता. त्या वेळी १२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील १६ विद्यार्थी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्षभरापूर्वी, गेल्या नोव्हेंबरच्या परीक्षेत नगर केंद्राचा निकाल विक्रमी म्हणजे २२ टक्के लागला होता. त्याहीवेळी १२५ विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा दिली होती, त्यातील तब्बल ३० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सनदी लेखापाल झाले होते. मागच्या या दोन परीक्षांच्या तुलनेत यंदा हा निकाल अवघ्या दोन-अडीच टक्क्यांवर आला आहे.
सीएच्या परीक्षेच्या निकालाची परंपरा गेली वर्षांनुवर्षे जेमतेम निकालाचीच होती. मागची एक, दोन वर्षे त्यात ढिलाई आली. मात्र यंदा हा निकाल पुन्हा पहिल्याप्रमाणेच कडक झाला. बऱ्याचदा पेपरच कठीण काढले जातात, शिवाय व्यावसायिक क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊनही आधीच उत्तीर्णाचे प्रमाण ठरवले जाते व त्यानुसार निकाल घोषित केला जातो.