या लोकशाही देशात कुणीही सामान्य नागरिक आमदार, खासदार किंवा राज्यपाल होऊ शकतो. आदिवासी बांधवांचा विकास केवळ लोकशाही व्यवस्थेतच होऊ शकतो. शासनाच्या विविध योजनांबरोबर वनउपजांवरील हक्काचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले.
वनहक्क अधिनियमांतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून गडचिरोली जिल्ह्य़ातील ११ ग्रामस्थांनी तेंदूपाने व्यवसाय यशस्वी करून ग्रामस्थांना रोजगार मिळवून दिला. हा अभिनव उपक्रम राबवणारा गडचिरोली जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था व आरमोरी तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामसभांतर्फे आरमोरी तालुक्यातील कुकडी (मोहटोला) येथे आयोजित केलेल्या सामूहिक वनहक्कातील वनउपजांवर आधारित तेंदूपाने व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातील बोनसच्या वितरण कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्यपालांचे प्रधान सचिव उमेशचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी रणजित कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य वनसंरक्षक एस.के. रेड्डी, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद सुकळीकर, सचिव दिलीप गोडे, खोज संस्थेच्या सचिव पौर्णिमा उपाध्याय प्रामुख्याने उपस्थित होते. या भागातील जमीन आणि वने आदिवासी बांधवांची असल्याचे सांगून राज्यपाल शंकरनारायणन म्हणाले, या वनांवर आधारित वनउपजांचा लाभ घेऊन स्वत:चा विकास करावा. या कार्यात महसूल व वनविभागाचे १०० टक्के सहकार्य मिळेल.
आदिवासी बांधवांच्या जमिनी व हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांनी वनउपजांवर आधारित तेंदूपाने संकलनासारखे विविध व्यवसाय करून, तसेच अधिकाधिक श्रम करून आर्थिक उन्नती करावी.
शिक्षणाशिवाय विकास अशक्य असून आदिवासी बांधवांनी आर्थिक विकासासोबतच आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. शासनाने आश्रमशाळांची निर्मिती केली आहे. त्या ठिकाणी शिक्षण, निवास व जेवणाची मोफत सोय उपलब्ध आहे. वाईट व्यसनांपासून दूर राहून आपल्या पाल्यांना डॉक्टर, अभियंता, आयएएस, आयपीएस अधिकारी करण्याचे ध्यये बाळगावे, तसेच शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते नरोटी चक ग्रामसभेचे अध्यक्ष खुशाल वलादे, मोहटोला ग्रामसभेच्या अध्यक्षा वृंदा तुलावी, कुकडीचे रघुराम कुमोटी, डोंगरतमाशी ग्रामसभेचे अध्यक्ष राजीराम मडावी, कुरुंडी चकचे रत्नाकर अटरगडे, टेंभा चकचे मंगेश लाकडे, मोरी चकचे जगन्नाथ मडावी, मरेगावचे निनाद येवले, चांभार्डाचे विनोद मुत्तेमवार यांना बोनसचे धनादेश देऊन त्यांचा गौरव केला. त्याचबरोबर बांबू विक्रीसाठी प्रमोद सहारे यांना राज्यपालांच्या हस्ते धनादेश देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल महात्मे यांनी केले. आभार दिलीप मस्के यांनी मानले.