उन्हाळा लागण्यास अजून बराच अवधी असला, तरी विदर्भातील सिंचन प्रकल्पातील जलसाठा झपाटय़ाने कमी होत चालला असून विशेषत: पश्चिम विदर्भातील काही भागात जलसंकटाची चाहूल लागली आहे. विदर्भातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ६२ टक्के जलसाठा आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा या प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. नळगंगात १२ टक्के आणि पेनटाकळीत तर दोनच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा विदर्भात बुलढाणा जिल्ह्य़ाचा अपवाद वगळता सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाला, सध्या पूर्व विदर्भात तर पाणीसाठा समाधानकारक आहे, पण पश्चिम विदर्भातील काही मोठय़ा प्रकल्पांसह मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसंचय होऊ न शकल्याने पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट काही भागात आतापासूनच जाणवू लागले आहे.
सिंचनासाठी आणि उद्योगांसाठी पाण्याचा वापर वाढल्याने अनेक सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. पिण्यासाठी पुरेसे पाणी राखून ठेवण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना यंदा बरीच कसरत करावी लागणार आहे. विदर्भात मोठे, मध्यम आणि लघू असे मिळून एकूण ७२५ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधील जलसाठवणुकीची क्षमता ६ हजार ९०२ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सर्व प्रकल्पांमध्ये ६२ टक्के म्हणजे ४ हजार ३८१ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ६० टक्के पाण्याची साठवणूक होती. विदर्भातील मध्यम प्रकल्पांचीही स्थिती चांगली नाही. एकूण ६३ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ७७० दलघमी म्हणजे ६१ टक्के जलसाठा आहे. नागपूर विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५५० दलघमीपर्यंत पाण्याची साठवणूक केली जाऊ शकते, पण सध्या या प्रकल्पांमध्ये २७८ म्हणजे ५० टक्केच पाणीसाठा आहे. ३१० लघू प्रकल्पांमध्ये २३९ दलघमी म्हणजे ५० टक्के जलसंचय आहे.
अमरावती विभागातील २३ मध्यम प्रकल्पांमध्ये ४९२ दलघमी (७५ टक्के) तर ३३३ लघू प्रकल्पांमध्ये ५३० दलघमी (६३ टक्के) पाणीसाठा आहे. आठवडाभरात सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचा पाणीसाठा सात दिवसांमध्ये दोन टक्क्यांनी, पूस प्रकल्पाचा पाच टक्क्यांनी अरूणावती आणि काटेपूर्णा प्रकल्पाचा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे. लोअर वेणा नांद प्रकल्पाचा जलसाठा आठवडाभरात ११ टक्क्यांनी वडगावचा ७ टक्के, कामठी खरी, बोर, धाम आणि पोथरा प्रकल्पातूनही पाच टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.    
विदर्भातील सर्वात मोठय़ा पेंच तोतलाडोह प्रकल्पामध्ये ७५६ दलघमी (७२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये ४८५ दलघमी (८६ टक्के), गोसीखूर्द २०३ दलघमी (६८ टक्के) आणि बेंबळा ११२ दलघमी (३७ टक्के) पूर्व विदर्भातील कामठी खरी (८० टक्के), बाघ पुजारीटोला (३१ टक्के), इटियाडोह (७६ टक्के), रामटेक (३२ टक्के), लोअर वणा नांद (२९ टक्के),वडगाव (६९ टक्के), सिरपूर (६६ टक्के), कालीसरार (१३ टक्के), आसोलामोंढा (३२ टक्के), बोर (४५ टक्के), धाम (६९ टक्के), पोथरा (६१ टक्के), लोअर वर्धा (५७ टक्के), तसेच पश्चिम विदर्भातील पूस (९५ टक्के), वाण (९५ टक्के) पेनटाकळी (२ टक्के), नळगंगा (२ टक्के), काटेपूर्णा (६५ टक्के),  आणि अरूणावती प्रकल्प  ८१ टक्के