कल्याण-डोंबिवली शहरांत १४० ठिकाणी उघडय़ावर मटण तसेच मासळीची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. उघडय़ावर बसणारे विक्रते टाकाऊ पदार्थ जवळच्या नाल्यात आणि परिसरात टाकत आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या मांसविक्रीवर कारवाई करण्याऐवजी महापालिकेचा बाजार परवाना विभाग या दुकानदारांकडून दररोज ५० रुपये शुल्क आकारून त्यांना व्यवसाय करू देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांची नागरी वस्ती झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या वस्तीप्रमाणे जागोजागी मांस विक्रीची दुकाने सुरू होत आहेत. मांस विक्रीतील टाकाऊ पदार्थ जवळच्या गटारात, कचराकुंडीत टाकले जातात. रात्री उशिरापर्यंत कल्याणमध्ये हा अनधिकृत मांस विक्री तसेच निर्यातीचा व्यवसाय तेजीत असतो. जैविक कचरा अधिनियमानुसार हा कचरा शहराबाहेर शास्त्रीय पद्धतीने टाकला पाहिजे. या व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी महापालिका कर्मचारी त्यांच्याकडून शुल्क वसूल करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीत ३७६ मटण, मांस विक्री करणारे परवानाधारक विक्रेते आहेत. डोंबिवलीत दत्तनगर, एमआयडीसी, चोळेगाव, रेतीबंदर, उमेशनगर, गरीबाचा वाडा शारदा इमारतीजवळ, बावनचाळ, कोपररोड, फुलेनगर, राजूनगर, एकतानगर परिसर. कल्याण : शहाड, मांडा, मोहने, अटाळी, आधारवाडी, मिलिंदनगर, नेतिवली, लालचौकी, बैलबाजार, वालधुनी, मलंगरोड, तिसगावनाका, खडेगोळवली, चिंचपाडा परिसरात मांस विक्रीची बेकायदे दुकाने आहेत. डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोरील मासळीबाजार विकसित करण्याचा महापालिकेचा प्रकल्प १९९५ पासून राजकीय वादामुळे रखडला आहे. या ठिकाणी भव्य दोन ते तीन मजली मासळीबाजार विकसित करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. कल्याणमधील न्यायालयाच्या बाजूकडील पोलीस वसाहतीमध्ये मच्छीमार केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. मात्र हे प्रकल्प अडगळीत सापडले आहेत.