ठाणे जिल्ह्य़ाच्या आदिवासी, डोंगराळ भागात ससा, मोर या जंगली प्राण्यांना मारण्यासाठी शिकाऱ्यांनी लोखंडी तारांचे सापळे हे नवीन तंत्र विकसित केले आहे. आदिवासी, डोंगराळ भागात फार्म हाऊस, गृह प्रकल्प उभे राहात आहेत. जंगली प्राण्यांचे पाणवठे असलेल्या भागात हे प्रकल्प उभे राहात असल्याने पाणी व आसऱ्यासाठी भेदरलेले हे जंगली प्राणी अलीकडे गावाच्या परिसरातील डोंगर, जंगलांमध्ये आश्रयाला आले आहेत. मनुष्य वस्तीत हे प्राणी आल्याने त्यांची शिकार करणे सोपे झाल्याने शिकारी लोक या प्राण्यांना मारण्यासाठी सुताच्या जाळ्यांऐवजी तारांचे सापळे वापरून ‘जंगलांचे वैभव’ नष्ट करीत आहेत.
जंगली प्राणी नष्ट होत असताना वन विभाग या विषयावर काहीही करताना दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्य़ातील मोखाडा, तलासरी, जव्हार, कसारा, भातसा, तानसा, वैतरणा धरण, प्रस्तावित मुंब्री धरण परिसर, डोळखांब, घाटघर, शिरोशी या सह्य़ाद्रीच्या रांगा गेलेला भाग, माळचे पठार, माळशेज घाटाचा काही भाग या सगळ्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात जंगल आहे. हे भाग पाणी असलेल्या पट्टय़ात असल्याने वाघ, हरीण, भेकर (हरीण जातीमधील एक प्रकार), तरस, रानडुकरे, नीळ, ससे, मोर अशा अनेक जंगली प्राणी, पक्ष्यांचा वावर या भागात आढळून येतो.  
 रिकाम्या हातांना शिकारीचे काम
या जंगल पट्टय़ात आदिवासी लोक राहतात. दिवाळीनंतर भात, वरई, नागलीचा हंगाम संपल्यानंतर मे महिन्यापर्यंत या मंडळींना शेतीविषयक कोणते काम नसल्याने ही मंडळी शिकारीच्या मागे लागतात. शहरी भागातील हौशी नागरिक रात्रीच्या वेळेत या भागांमध्ये शिकारीला येतात. जंगलांना वणवे लावून प्राण्यांची निवासस्थाने शोधणे, रात्रीच्या वेळेत १५ ते २० जणांचा गट करून प्रखर झोताच्या बॅटऱ्या घेऊन जंगलात जाऊन प्राण्यांना शोधून त्यांची शिकार करणे, असे प्रकार गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागात सुरू आहेत, असे या भागातील नागरिकांकडून सांगितले जाते. वन विभाग याविषयी फार काही करताना दिसत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
काही गावचे ग्रामस्थ शिकारीसाठी आलेल्या आदिवासींना रोखण्यासाठी पुढाकार घेतात. आदिवासींना मारहाण केली म्हणून शिकारी आदिवासींकडून ग्रामस्थांवर उलट गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे समोर जंगली प्राण्याची शिकार होत असताना ग्रामस्थांना हतबलतेने पाहात बसावे लागते, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ससे, मोर, हरीण, तरसाच्या शिकारी करणाऱ्या शिकारींवर फौजदारी कारवाई केली. पोलिसांमार्फत न्यायालयाकडून या शिकारींना शिक्षा झाली तर या शिकारी रोखणे शक्य आहे, असे या ग्रामस्थांनी सांगितले.
कारवाई सुरू आहे
वन विभागाच्या ठाणे व शहापूर विभागांशी संपर्क साधल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जंगली शिकार करणाऱ्या शिकारींवर वन विभागातर्फे कारवाई सुरू असते. यासाठी वन विभागाचे स्वतंत्र भरारी पथक आहे. अलीकडेच दोन ते तीन शिकारींवर कारवाई करून त्यांना कोठडी झाली आहे. जंगलपट्टय़ात कोठेही शिकार होत असेल, शिकारींची ओळख असेल तर स्थानिक ग्रामस्थांनी वन विभाग भरारी पथकाच्या ९२०९४६१४२५ या भ्रमणध्वनीवर शिकारींची व त्या परिसराची माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
शिकारीचे तंत्र
यापूर्वी जंगली प्राण्यांना मारण्यासाठी शिकाऱ्यांकडून ठाशीव बंदूक किंवा सुताची जाळी वापरली जात असत. आता ठाशीव बंदुकांचा वापर कमी झाला आहे. आता कष्ट करण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे शिकारीही सुताची २५ ते ३० किलो वजनाची जाळी पाठीवर घेऊन रानोमाळ घेऊन हिंडण्यास तयार नाहीत. सुताची जाळी विणणारी जुनीजाणती मंडळी गाव, आदिवासी पाडय़ांवर होती ती वयस्कर किंवा दिवंगत झाली आहेत. बाजारातील महागडी जाळी घेणे परवडत नाहीत. त्यामुळे आदिवासी मंडळींनी आता शिकारीचे नवे तंत्र विकसित केले आहे. इमारतींचे लोखंडी गज बांधण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडाची पातळ लांबलचक बारीक तार दुकानदाराकडून विकत घेतली जाते. ही बारीक तार घेऊन जंगलातील पाणवठा शोधला जातो. त्या पाणवठय़ावर कोणत्या मार्गाने ससा, मोर किंवा इतर जंगली प्राणी येतात याचा अंदाज शिकारी घेतात. पायांचा ठशांचा माग घेतात. त्याप्रमाणे ते जंगलात प्राण्यांच्या मार्गात एक ते पाच थरांत दोन्ही बाजूच्या झुडपांना तारा बांधून ठेवतात. दिवसभरात मोर, ससे या मार्गातून जात असताना या तारांच्या सापळ्यात त्यांचे पाय, पंख अडकतात. त्यामधून सोडवणूक करताना ते आणखी तारेच्या फेऱ्यांमध्ये अडकत जाऊन रक्तबंबाळ होऊन तेथे निपचित पडतात. काही अति रक्त स्रावामुळे जागीच प्राण सोडतात. शिकारी दुसऱ्या दिवशी सापळ्याच्या ठिकाणी आल्यावर त्याला धावपळ न करता आयतीच शिकार मिळते. प्राणी जिवंत असेल तर त्याचे रक्त हे शिकारी पितात, मांस भाजून खातात. वर्षभरात हे मांस खाल्ले की शरीरात ऊर्जा राहते असा एक समज या शिकारींमध्ये असल्याचे बोलले जाते. गावांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात मोरांचे थवे आढळून येतात. स्थानिक ग्रामस्थ या मोरांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील असतात. शिकारी या मोरांच्या गुपचूप शिकारी करतात. जंगलातील ससे, मोर, हरणे यांचे वास्तव्य या शिकारीमुळे कमी होत चालले आहे.