यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सप्तपदी मंगल कार्यालय विटा रोड, कराड येथे उद्या शनिवार (दि. २९) व रविवार (दि. ३०) या दोन दिवसांमध्ये आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते होणार आहे. व्यसनमुक्त चळवळीचे आधारवड असलेले डॉ. अनिल अवचट हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आमदार बाळासाहेब पाटील व नगराध्यक्षा उमा हिंगमिरे यावेळी उपस्थित राहणार आहेत, तर संमेलनाचा समारोप आंतरराष्ट्रीय मधुमेह तज्ज्ञ डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व इंद्रजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
संमेलनाची सुरुवात शनिवार, २९ रोजी सकाळी ९ वाजता विरंगुळा ते संमेलन स्थळापर्यंत शोभायात्रेने होणार आहे. या संमेलनात शनिवारी अपंगांशी संबंधित ‘अपंगांची साहित्य व माध्यमिक प्रतिमा आणि वास्तव’, ‘अपंग पुनर्वसन कायदा व वास्तव’ या विषयावरील परिसंवाद होणार आहेत. या परिसंवादात सोनाली नवांगुळ, जयंत उथळे, प्रा. अरविंद जाधव, तुषार भद्रे, अ‍ॅव्हेलिनो डीसा, भाल कोरगावकर, अ‍ॅड. उदय वारुंजीकर, प्रा. संजय जैन, हेमा सोनी सहभागी होणार आहेत. याचबरोबर पहिल्या दिवशी    कविसंमेलन, अपंगांचा सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश आहे. रविवारी  सकाळी साडेआठ वाजता ‘माझा संघर्ष’ या सदरात विविध ठिकाणाहून आलेले अपंग मनोगत व्यक्त करणार आहेत. अपंगत्वावर मात करून देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सकाळी साडेदहा वाजता होणार आहेत. त्यानंतर अपंग पुनर्वसन जबाबदारी पालकांची, समाजाची की शासनाची? या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. पंडित टापरे, प्रकाश भळगट, विजय मुनेश्वर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप आंतरराष्ट्रीय मधुमेह तज्ज्ञ डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व इंद्रजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील व मलकापूरचे नगराध्यक्ष मनोहर शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.