प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या रेल्वेच्या निंबळक येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. परवा (शनिवार) सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. हा रस्ता सुरू झाल्यामुळे मनमाडकडून पुण्याला जाणाऱ्या वाहनांना आता नगर शहरात येण्याची गरज भासणार नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी ही माहिती दिली. जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, आमदार बबनराव पाचपुते, आमदार अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेलार यांनी केले.
नगर शहरातून सात राज्यमार्ग जातात. लांब पल्ल्याच्या या मोठय़ा वाहतुकीचा शहरातील रहदारीवर मोठा ताण पडतो. तो कमी करण्यासाठी या सर्व राज्यमार्गाना जोडणारा शहराबाहेरील बाहय़वळण रस्ता प्रस्तावित असून त्यातील काही कामे झाली आहेत. मनमाड राज्यमार्ग व पुणे राज्यमार्ग या रस्त्यांना जोडणाऱ्या बाहय़वळण रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र या त्यात दौंड-मनमाड रेल्वेमार्ग जात असल्याने त्याचीच अडचण होती. ती दूर करण्यासाठी निंबळक येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला असून हे काम सुरू होण्यासच मोठा विलंब झाला. आता हे काम पूर्ण झाले असून, या उड्डाणपुलाचे उद्घाटन परवा (शनिवार) भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. लगेचच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.
पुणे, मनमाड, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण आणि दौंड सहा राज्यमार्ग नगर शहरातून जातात. अपवाद वगळता या सर्व राज्यमार्गावर लांब पल्ल्याची वाहतूक मोठी असून, त्यात प्रामुख्याने अवजड मालवाहू वाहनांचा समावेश आहे. या वाहतुकीचा शहराच्या अंतर्गत रहदारीवर विपरीत परिणाम होतो, शिवाय त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अशा अनेक अपघातांत आत्तापर्यंत अनेकांनी जीव गमवावा लागला. शहरातून जाणारे हे सर्वच राज्यमार्ग धोकेदायक बनले असून, या वाहनांमुळे रहदारीचीही नेहमीच मोठी कोंडी होते. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांबरोबरच लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही होतो. या रस्त्यामुळे त्यांचाही मोठा वेळ वाचेल.
बाहय़वळण रस्त्याचे पूर्ण वर्तुळ तयार झाले नसले तरी या उड्डाणपुलामुळे मनमाडकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक आता नगरह शहरात न येता विळद घाटातूनच या रस्त्याने थेट पुणे राज्यमार्गाकडे जाऊ शकेल. औरंगाबाद व सोलापूर या राज्यमार्गाना पर्यायी ठरणारा बाहय़वळण रस्ता पूर्ण झाला नसला तरी औरंगाबाद मार्गाने मराठवाडा, विदर्भाकडून येणारी वाहतूकही याच रस्त्याने पुण्याकडे जाणे शक्य असल्याने नगर शहरातील वाहतुकीचा मोठा ताण कमी होऊ शकेल.