दोन हजार रुपयाची साडी जेव्हा सेल लागलेला असताना पाचशे रुपयात मिळते ती खरेदी करायला लोकांची रांग लागते पण दोन हजार रुपये भाव असलेला एखादा चांगला शेअर जेव्हा पाचशे रुपयात मिळत असतो तो खरेदी करण्याऐवजी “मंदी आली” म्हणून लोक तिकडे पाठ फिरवतात हे अनाकलनीय आहे. खरे तर ही मंदी नसून उत्तम शेअर्स खरेदी करायची संधी आहे, असे प्रतिपादन सीडीएसएलचे  चंद्रशेखर ठाकूर यानी केले. लोकप्रभा साप्ताहिकातर्फे सीडीएसएलच्या सहकार्याने बोरिवली, मुलुंड आणि दादर अशा तीन कार्यक्रमांच्या मालिकेतील पहिल्या बोरिवली येथील कार्यक्रमात ते बोलत होते. शेअर बाजाराच्या कार्यप्रणाली तसेच गुंतवणूकदाराना असलेले संरक्षण वगरे बाबी स्लाइड शोच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगत त्यानी श्रोत्यांची मने जिंकली. यावेळी आयसीआयसीआय सेक्युरिटीजचे सुवाजित रे यानी देखील गुंतवणुकीचे काही मंत्र सांगितले.
मुलुंड आणि दादर येथील कार्यक्रम सीडीएसएलचे अजित मंजुरे यानी सादर केले. मंजुरे यानी सांप्रत गुंतवणूकदारांचे प्रशिक्षक या नव्या भूमिकेतून गुंतवणूकदारांचे प्रबोधन करताना गुंतवणूकदारानी कोणती पथ्ये पाळावीत हे सांगितले. गुंतवणूकीचे विविध पर्याय तसेच प्रत्यक्ष सोने खरेदी न करता गोल्ड बाँड डिमॅट स्वरूपात खरेदी करणे कसे फायद्याचे आहे ते त्यानी उदाहरणासहीत स्पष्ट केले. आता परत परत केवायसी देण्याची गरज नसल्याचे सांगताना त्यानी भागधारक ई व्होटिंगचा पर्याय वापरून आपले बहुमूल्य मतदान करू शकतात याचा आवर्जून उल्लेख केला. लोकसत्ताचे वरिष्ठ अधिकारी केदार वाळिंबे बोरिवली येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचा सत्कार चंद्रशेखर ठाकूर यांचे हस्ते करण्यात आला. श..शेअर बाजाराचा या कार्यक्रमाच्या यशात लोकसत्ताचा सिंहाचा वाटा आहे याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ठाकूर यानी केला.