ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमीन(ए.आय.एम.आय.एम.)पक्षाचे खासदार असुद्दिन ओवेसी यांच्या येत्या १४ जून रोजी येथील अन्सार जमात खानातील नियोजित सभेला तसेच त्यांच्या शहरातील प्रवेशाला विविध हिंदू संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. ओवेसींच्या संभाव्य वादग्रस्त भाषणाने संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव शहरातील शांततेला गालबोट लागण्याची भीती व्यक्त करत हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना
शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी
केली आहे. प्रक्षोभक भाषणामुळे ए.आय.एम.आय.एम. हा पक्ष तसेच या पक्षाचे संस्थापक अकबरउद्दिन आणि खासदार असुद्दिन ओवेसी हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले.
हैद्राबादमधील या पक्षाचे देशातील अन्य मुस्लीमबहूल भागात पाळेमुळे रूजविण्याचेही त्यानंतर प्रयत्न सुरू झाले. अलीकडे मालेगावातदेखील काही जणांनी या पक्षाचे कार्य सुरू केले आहे.स्वत:ला या पक्षाचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या त्यातील काही जणांच्या पुढाकाराने खासदार ओवेसी यांच्या येथील या दौऱ्याचे व सभेचे प्रयोजन करण्यात आल्याचे सांगितले जाते. या नियोजित दौऱ्यानुसार ओवेसी यांचे १३ तारखेला येथे आगमन होणार असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अन्सार जमातखाना येथे जाहीर सभा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. शहराची पाश्र्वभूमी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अद्याप तशी परवानगी दिलेली नाही. मात्र या दौऱ्याची हिंदू संघटनांना कुणकुण लागल्याने त्यांनी त्यास जोरदार विरोध सुरू केला आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीराम मंदीर सेवा समिती या सारख्या संघटनांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी उदय किसवे यांना निवेदन देऊन ओवेसी यांच्या सभेला तसेच शहराच्या प्रवेशास बंदी करावी, अशी मागणी केली आहे.