News Flash

पथदिवे तपासणीला विखे कॉलेजचाही नकार

महापालिकेच्या कामांसंबंधी होत असलेल्या विविध आरोपांचा धसका आता फक्त ठेकेदारांनीच नाही तर अन्य सरकारी संस्थांनीही घेतला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन तक्रार करण्यात आलेल्या काही कोटी

| January 17, 2013 03:52 am

महापालिकेच्या कामांसंबंधी होत असलेल्या विविध आरोपांचा धसका आता फक्त ठेकेदारांनीच नाही तर अन्य सरकारी संस्थांनीही घेतला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन तक्रार करण्यात आलेल्या काही कोटी रूपयांच्या विद्युत दिव्याच्या कामांची तपासणी करण्यास आता विखे अभियांत्रिकी महाविद्यालयानेही नकार दिला असल्याचे समजते.
या कामाची तपासणी करण्यास यापूर्वीच सरकारच्या नाशिक विभागीय कार्यालयाने, तसेच नंतर पॉलिटेक्निक महाविद्यालयानेही नकार दिला आहे. सलग तीन संस्थांनी नकार दिलेल्या या कामाची तपासणी आता आणखी कोणत्या संस्थेकडे सोपवायची असा प्रश्न मनपा प्रशासनाला पडला आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवून नंतर त्याबाबत तक्रार झाल्यामुळे या कामाची तटस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचे प्रशासनानेच जाहीर केले आहे. ज्या कंपनीचे दिवे बसवायला हवे होते ते न बसवता अन्य कंपन्यांचे स्वस्तातील दिवे बसवण्यात आल्याचे यात बोलले जात आहे.
सरकारच्याच एका योजनेतून मनमाड रस्ता, पाईपलाईन रस्ता, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात नव्या पद्धतीचे वीज बचत करणारे एलईडी दिवे बसवण्याचे काही कोटी रूपयांचे काम मध्यंतरी मनपाने केले. काम शहरातीलच काही ठेकेदारांच्या नावावर असले तरीही त्यात मनपाचे काही पदाधिकारीही भागीदार असल्याची चर्चा आहे. त्यांचे पाठबळ असल्यामुळेच ठेकेदारांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले नाही, स्वस्तातील दिवे बसवले अशी तक्रार या कामात झाली आहे.
आयुक्त विजय कुलकर्णी यांनी या कामाची तटस्थ यंत्रणेकडून तपासणी करू, असे जाहीर केले. त्याप्रमाणे सरकारच्याच नाशिक विभागीय कार्यालयाला तपासणीबाबत कळवण्यात आले. त्यांनी स्पष्ट नकार दिला व पॉलिटेक्निककडून हे काम करून घ्यावे असे सुचवले. आयुक्तांनी त्यांनाही पत्र लिहिले तर त्यांनीही हे काम करता येणार नाही म्हणून असमर्थतता दर्शवली.
अखेर आयुक्तांनी विखे अभियांत्रिकी महाविद्यालयाला त्यांच्या मानधनाच्या धनादेशासह या कामाची तपासणी करण्याबाबत लिहिले. त्यांनी ते धनादेशही परत पाठवले व काम करता येणार नाही असे स्पष्टपणे कळवले. कामाची तपासणी म्हणजे फक्त विद्यूत दिवे निविदेत नमूद आहे त्या कंपनीचे आहेत किंवा नाही ते तपासायचे आहेत. इतक्या साध्या कामाला नकार मिळण्यामागे कामात गडबड असेल तर ठेकेदारांचा दबाव व नसेल तर तक्रारदारांचा दबाव यातून खरे काम करण्यास अडचण हेच कारण असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, विद्युत दिव्यांच्या कामाची तक्रार झाल्यामुळे ठेकेदारांनी या योजनेतील अन्य कामे थांबवली असल्याची माहिती मिळाली. शहराच्या सर्वच भागांत टप्प्याटप्प्याने एलईडी दिवे बसवण्याची ही योजना आहे. त्यासाठी केंद्र तसेच राज्याकडून मनपाला निधी मिळाला आहे. त्यातूनच ही कामे केली जात आहेत. बिलाची खात्री असल्यामुळे ठेकेदारांनी ही कामे घेतली, काही अडचणी येऊ नयेत यासाठी काहींनी पदाधिकाऱ्यांनाच भागीदार म्हणून घेतले, मात्र तरीही कामाबाबत तक्रारी झाल्यामुळे त्यांनी आता पुढची कामे थांबवली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:52 am

Web Title: opposed by vikhe college to cheaks the road lamp
टॅग : Corporation
Next Stories
1 उपमहापौरांनी थांबवले चुकीचे बांधकाम
2 विखे यांच्या दौऱ्यात प्रशासनातील तक्रारींचा पाढा
3 दुसऱ्या पत्नीच्या जाचहाटाबद्दल शिक्षेस पात्र कलम लागू होत नाही
Just Now!
X