सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहराचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या ‘कलाग्राम’ या प्रकल्पास गोवर्धन शिवारातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. मंगळवारी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन सुरू असतानाच महामंडळ आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जागेची मोजणी केली. या वेळी विरोध करणाऱ्या सहा ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गोवर्धन येथील गट नं. ७अ मधील चार हेक्टर २६आर जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास जिल्हाधिकाऱ्यांकडून कलाग्राम या प्रकल्पासाठी देण्यात आली. मात्र या जागेवर प्रकल्प होऊ देण्यास ग्रामस्थांचा विरोध असून, या जागेवर गावठाण विस्तार करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. क्रीडांगणासाठी एक  हेक्टर जागा व व्यायामशाळेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु त्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन नियोजित जागा कलाग्रामसाठी देण्यात येऊ नये, असे निवेदन तहसीलदांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नियोजित जागेस ग्रामस्थांसह उपस्थितांनी एकमताने विरोध दर्शविला. गाव शिवारात पर्यायी जागा सुचविल्यास त्यास विरोध राहणार नाही, असेही संबंधितांकडून सांगण्यात आले.   मात्र      ग्रामस्थांचा विरोध डावलत    महामंडळ   आणि प्रशासकीय अधिकारी यांनी गट नं. ७अ मधील जागेची मोजणी केली. या वेळी काही ग्रामस्थांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
ग्रामसभेतील ठरावाची शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, या संदर्भात महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी या जागेसंदर्भात माहिती दिली. त्या जागेवर ग्रामपंचायतीचे अनधिकृत २१ गाळे आहेत. याशिवाय तिथे अतिक्रमणही करण्यात आले आहे. यामुळे केलेली कारवाई योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी आत्तापर्यंत हा विषय प्रशासनाच्या लक्षात का आला नाही, अशी विचारणा केली आहे.