* परभणी जि.प.ची  आज विशेष सभा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी २ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. राष्ट्रवादीने भाजप व काँग्रेसच्या सहकार्याने दाखल केलेला अविश्वास ठराव आपसातील मतभेदामुळे बारगळण्याचीच शक्यता आहे. ठरावाआधीची व्यूहरचना पूर्ण फिस्कटल्याने मित्रगोत्री यांच्या विरोधातल्या ठरावाला फारसा अर्थ उरणार नसल्याचे संकेत आहेत.
मित्रगोत्री हे नियमानुसार काम करणारे अधिकारी असून त्यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांसह काही सदस्य नाराज आहेत. मित्रगोत्री हे पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, फायली तुंबवतात असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  जि. प. अध्यक्ष मीना बुधवंत यांच्या दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर ५२पैकी ३४ सदस्यांच्या सहय़ा आहेत.  हा ठराव संमत व्हावा यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, जि. प. अध्यक्ष बुधवंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ठराव दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या काही जि. प. सदस्यांनी त्यास विरोध केला. भाजपचे सभापती गणेशराव रोकडे यांनी मात्र ठरावाशी आपला संबंध नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेचा सुरुवातीपासून ठरावाला विरोध आहे, तर काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली.  राष्ट्रवादीमध्ये ठरावासंबंधात दोन मतप्रवाह आहे. ठराव संमत करण्यासाठी ३५ संख्याबळ आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे २५ सदस्य आहेत.