News Flash

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्यापासून ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य समारोह

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ३ ते ११ जानेवारी दरम्यान ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा व लोकनृत्य समारोह आयोजित करण्यात आला आहे.

| January 2, 2015 12:37 pm

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ३ ते ११ जानेवारी दरम्यान ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा व लोकनृत्य समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात देशभरातील हस्तशिल्प प्रदर्शनासह विविध राज्यातील आकर्षक लोकनृत्य सादर होणार आहे. देशभरातील ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्तशिल्पी आणि लोककलावंतांसह ३०० कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहे.
सिव्हील लाईनमधील केंद्राच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन ३ जानेवारीला दुपारी ४ वाजता विविध राज्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्तशिल्पकार आणि लोककलावंतांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सवाची माहिती देताना केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार यांनी सांगितले, दरवर्षीपेक्षा यावेळी महोत्सव वेगळा राहणार आहे. २२ राज्यातील १५० पेक्षा अधिक लोककलावंत एकत्र येणार असल्यामुळे विविध राज्याची संस्कृती या महोत्सवात अनुभवता येणार आहे.
हस्तशिल्पकार आणि आदिवासी कलावंतांच्या कलेच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच ग्रामीण हस्तशिल्पकारांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमापैकी ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य समारोह गेल्या १९९२ पासून केंद्रातर्फे आयोजित केला जातो. केंद्रातर्फे होत असलेल्या या ऑरेंज सिटी मेळाला दरवर्षी रसिकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतो. केंद्राच्या अंतर्गत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व छत्तीसगढ या राज्याचा समावेश आहे. संगीत, नृत्य, नाटय़, लोककला आदिवासी कला दृष्यकला, इत्यादी कलांचे जतन व संवर्धन, प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळा, महोत्सव, स्पर्धा चर्चासत्र आदी कार्यक्रम आयोजित करून लुप्तप्राय होत चाललेल्या कलाप्रकाराच्या संवर्धनासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. महोत्सवाला ग्रामीण भागाचे स्वरूप राहणार आहे.
 प्रत्येक राज्यातील खाद्य संस्कृतीचा आनंद महोत्सवात घेता येणार आहे. जंकफूड आणि विदेशी खाद्य पदार्थ राहणार नाही. घुमर, धमाल नृत्य, नगाडा वादन, बरदोई शिखला, ढाल घुंगरी, बररुंबा, चरी, भवई नृत्य, संबलपुपी, दालखाई डांगी नृत्य सादर होणार आहे. सायंकाळी लोककलावंतांचे कार्यक्रम सादर होतील. राजस्थानचा मांमगणियार गायक, ताळिनाडूचे कावडी करघम व हरियाणा राज्यातील जादूगार महोत्सवात राहतील.
याशिवाय विविध राज्यातून टेराकोटा, हॅन्डलूम, मेटल, वुड कार्विग, ग्लास वर्क, चंदेरी साडी, चिकन एम्ब्रायडरी, ब्ल्यू व ब्लॅक, बांबू वर्क, कारपेट , टाई अँड डाई, स्टोन क्राफ्ट, खुरजा पॉटरी, सिल्वर फिलग्री, जरी वर्क, कोसा, बटिक प्रिंट, फुलकारी, कोसा, खादी छिपशिल्प इत्यादी हस्तशिल्प कलेतील वस्तू प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहेत.
या व्यतिरिक्त खवैय्यासाठी ३० वैशिष्टपूर्ण स्टॉल राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था आमदार निवासमध्ये राहणार आहे. पत्रकार परिषदेला दीपक कुळकर्णी, गणेश थोरात उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:37 pm

Web Title: orange city craft fair by south central zone cultural centre
Next Stories
1 नागपूरकरांनी तीन कोटी रुपयांचे मद्य रिचवले
2 नव्या वर्षांत शिक्षकांना १२४ सुटय़ा
3 शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी भावी शिक्षकांची मदत घेणार
Just Now!
X