मराठवाडय़ातील फलोत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर ३५ हजार रुपयांची मदत कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे नागपूर व अमरावती विभागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.
नागपूर व अमरावती विभागात संत्रा, मोसंबी व लिंबू लागवड करण्यात आली असून यावर्षी मृग बहारच आला नाही. त्यामुळे शेतकरी अत्यंत चिंतित आहे. खरिपाचे पीक सोयाबीन, कापूस, ज्वारी पूर्णत: हातातून गेले आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने व पाऊस कमी झाल्याने विहिरीत ओलितासाठी पाणी नाही. त्यामुळे रब्बीचे पीक घेणे सुद्धा कठीण झाले आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सतत दोन वर्षे नैसर्गिक संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त फलोत्पादन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ३५ हजार रुपये मदत जाहीर केली. ते फक्त मराठवाडय़ाचे मंत्री नाहीत. त्यामुळे विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्य़ातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटते. संत्रानगरीत हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात तरी आपण मराठवाडय़ाप्रमाणेच मदत जाहीर करावी, अशी विनंतीही शिंदे यांनी केली आहे. यासाठी नागपूर व अमरावती जिल्ह्य़ांतील आमदारांनी पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.