जायकवाडी जलाशयातून दररोज १२० कोटी लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते. तापमानात दररोज वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. शहराला लागणारे पाणी मिळू शकेल, मात्र सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांत काही ठिकाणी तीव्र पाणीटंचाई होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, तीव्र पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर सातारा परिसरातील बांधकामे थांबविण्याचे आदेश मंगळवारी बजावण्यात आले. बंदी आदेश मोडल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिला.
औरंगाबाद जिल्ह्य़ात सध्या ५०५ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दररोज पाणीपुरवठय़ावर होणारा खर्च २५ लाख एवढा आहे. शिवाय अधिग्रहित विहिरींवरचा खर्चही मोठा आहे. पैसे अधिक लागत असले तरी पाणी देण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, असे त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जायकवाडी जलाशयातील मृत साठय़ातून दररोज २०० दलघमी पाणी उचलले जाईल. शहराला टंचाईची झळ फारशी जाणवणार नाही. मात्र, सिल्लोड तालुक्यातील स्रोत कमी झाल्याने टंचाईची तीव्रता वाढेल. दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करता याव्यात, या साठी कृषी विभागामार्फत ८२ सिमेंट बंधारे घेण्यात येणार आहेत. उर्वरित साखळी सिमेंट बंधाऱ्याचीही मंजुरी दिली जाईल. जिल्ह्य़ात २०० बंधारे उभारण्यात येणार आहेत.
विहीर पुनर्भरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, जिल्ह्य़ात २८०० विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मोठय़ा इमारतींवर ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’चे प्रयोग हाती घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीवर हा प्रयोग हाती घेण्यात येणार असून पुढील आठवडय़ात त्याचे काम सुरू होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.