डॉ. वाणी यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा पुरस्कार मिळाला. या निमित्त वाणी यांनी पुणे व कोल्हापूरमधल्या सामाजिक संस्थांना केलेल्या मदतीबद्दल १८ संस्था आज त्यांना मानपत्र देणार आहेत. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील देवांग मेहता सभागृहात दुपारी ४.३० वाजता होणार आहे. यानिमित्त..
स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) या आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी हे गेली ४९ वर्षे कॅनडाचे नागरिक आहेत. नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच दूरचित्रवाणी व वर्तमानपत्रातून एक बातमी झळकली ‘‘कॅनडा सरकारने ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ३१ डिसेंबर २०१२ रोजी डॉ. जगन्नाथ वाणी यांना जाहीर केला.’’ समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. हा पुरस्कार म्हणजे कॅनडातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्यांचे जीवन समृद्ध करण्याची पावतीच आहे.
डॉ. वाणींनी कॅनडाबरोबरच आपल्या भारतासाठीही भरघोस कार्य केले आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध वाटांवर आलेल्या कडू-गोड अनुभवातून शिकत पुढे जाताना क्लेशदायी प्रसंगांतून झालेल्या जखमा आणि मागे राहिलेले व्रण कुरवाळत न बसता, मनोधैर्य जोपासत सत्कार्य करणारे, परमार्थासाठी कार्यरत असे डॉ. वाणी.
डॉ. वाणी यांचे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणं हे त्याचं स्वप्न कधीच नव्हतं. ते योगायोगाने कॅनडातील माँन्ट्रियल येथील मॅकगील विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्र (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स) या विषयात पीएच.डी. पदवीसाठी गेले. कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापकी केली, पुढे सन्माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. या वाटचालीत त्यांनी विद्यापीठात विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम, शिका व कमवा योजना, विविध शिष्यवृत्त्यांची निर्मिती, कॅलगरी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठस्थित परदेश सत्र अभ्यासक्रम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतातील पहिल्या विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या स्थापनेसाठी चालना, असे शैक्षणिक प्रकल्प सुरू केले.
त्यांच्या पत्नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. १९८० मध्ये ‘स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा’ या संस्थेची स्थापना आणि कॅलगरी विद्यापीठात ‘स्किझोफ्रेनिया’ या विषयावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूद केली. भारतामध्ये १९९७ साली ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’ (सा) या संस्थेची स्थापना करून मानसिक आजारी व्यक्ती व कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृी कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. ‘देवराई’ या चित्रपटाची निर्मिती करून ‘स्किझोफ्रेनियाविषयी जनजागृती घराघरात पोहोचवली.
डॉ. वाणींनी लिहिलेली ‘अंधारातील प्रकाशवाटा’ (काँटिनेंटल प्रकाशन, पुणे) आणि Triumphs and Tragedies (के. एस. वाणी मेमोरियल ट्रस्ट प्रकाशन, धुळे) ही पुस्तके त्यांचे मनोधैर्य, सामाजिक व शैक्षणिक कार्य आणि लोकसेवेतून केलेल्या आत्मशोधाची पावती आहे. त्यांच्या कार्याबद्दल कॅनडा व भारतात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. अनेक भावी पिढय़ांना प्रेरणादायी ठरेल असाच डॉ. वाणींच्या जीवनाचा पारदर्शी आलेख आहे.