भूखंड खरेदी करणाऱ्यास थायलंडची वारी आणि किमतीत ६० टक्के सूट, असे प्रलोभन देणाऱ्या बिल्डरने प्रत्यक्षात मात्र ग्राहकाला अंगठा दाखवून त्याची फसगत केली, असा ठपका ठेवून येथील एका बिल्डरला साडेसात लाख रुपये ग्राहकाला देण्याचा आदेश दिला आहे.
 या प्रकरणाची माहिती अशी की, येथील उमरसरा भागात असलेल्या नॅशनल बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांनी त्यांच्या सुदर्शन ले-आऊटमधील भूखंडांची विक्री करताना जो सर्वप्रथम भूखंड खरेदी करेल त्याला थायलंडची वारी आणि किंमतीत ६० टक्के सूट असे प्रलोभन दिले होते.
या प्रलोभनास बळी पडून मुरलीधर भगत यांनी २१ हजार रुपये अग्रिम देऊन एका भूखंडाची नोंदणी  केली होती, पण नॅशनल बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक अन्सार शेख यांनी भगत यांना भूखंड खरेदी करून दिला नाही व तो दुसऱ्याच ग्राहकाला विकून टाकला.
भगत यांना थायलंडची वारी आणि किमतीत ६० टक्के सूट यापकी काहीही मिळाले नाही व भूखंडही मिळाला नाही. भगत यांनी अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. मंचचे अध्यक्ष न्या. मििलद पवार व सदस्य अ‍ॅड. अशोक सोमवंशी यांनी नॅशनल बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक अन्सार शेख यांनी भगत यांना भूखंडाची आजची किंमत ७ लाख ३७ हजार रुपये व १२ टक्केव्याज तसेच मानसिक त्रासापायी २५ हजार रुपये आणि २ हजार रुपये तक्रार खर्च द्यावा, असा आदेश दिला आहे.