नैसर्गिक नाल्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश नागपूर ग्रामीणच्या नायब तहसीलदारांनी संबंधित तलाठय़ाला देऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटून गेला तरी ते अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने येत्या पावसाळ्यात बाजूच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. नायब तहसीलदार आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे संबंधित विभागाने पालन करावे, अशी मागणी करून न्यायाची अपेक्षा पीडित शेतकरी करीत आहे.  
कळमेश्वर मार्गावरील येरला येथील रहिवासी देवाजी पंचम शेवाळे (६०) यांचे पारडी मार्गावर वडिलोपार्जित अडीच एकर शेत आहे. या शेताला लागून पूर्व-पश्चिम असा १० फूट रुंदीचा नैसर्गिक नाला आहे. शेवाळे यांच्या शेताला लागून दक्षिण दिशेला नागपूर, सिव्हिल लाईन, हेरिटेज अपार्टमेंट, येथील मुर्तजा मन्सूरभाई यांचे शेत आहे. मन्सूरभाई यांनी तीन वर्षांपूर्वी या नाल्यावर अतिक्रमण करून इमारत बांधली. पाण्याचा निचरा होण्यासाठी इमारतीच्या खाली न्याल्याच्या जागेवर सिमेंटच्या पायल्या टाकल्या. परंतु पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने शेवाळे यांच्या शेतात पाणी शिरून त्यांचे प्रचंड नुकसान होते. गेल्या दोन वर्षांंपासून त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
यानंतर या नाल्यावरील अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी शेवाळे यांनी एका अर्जाद्वारे नागपूर ग्रामीणच्या नायब तहसीलदारांकडे केली. तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व केलेले अतिक्रमण पाडून टाकावे व नैसर्गिक नाला मोकळा करावा, असा आदेश २६ डिसेंबर २०१४ रोजी येरला येथील तलाठय़ाला दिला. या आदेशाला तीन महिने पूर्ण झाले तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यासोबतच जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनाही तक्रार करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पण, त्यांच्याही आदेशाचे पालन होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.  हे बांधकाम डिसेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. हे बांधकाम थांबवावे अशी विनंती शेवाळे यांनी तहसीलदार, कळमेश्वर पोलीस ठाणे व ग्रामपंचायतला केली होती. परंतु यापैकी कुणीही दखल घेतली नाही. या तक्रारीची वेळीच दखल घेतली नसती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. याप्रकरणी मूर्तजा मन्सूरभाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अतिक्रमण कसे योग्य आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्याने ग्रामपंचायत काहीही कारवाई करू शकत नसल्याचे ग्रामसेविका सरला चिमोटे यांनी सांगितले. तलाठी अजय खोब्रागडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.