‘शक्ती मिल’मधील सामूहिक बलात्कारातील अल्पवयीन आरोपींचा सहभाग उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलीस खडबडून जागे झाले आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल होते आणि सुधारगृहातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील सर्व बालगुन्हेगारांची कुंडली तयार करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत.
आतापर्यंत पोलीस ठाण्यात आरोपींची यादी छायाचित्रांसह लावली जाते. आता यापुढे संबंधित पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्य़ात असेलल्या  बालगुन्हेगारांची छायाचित्रांसह कुंडली तयार करण्यात येणार आहे. ही यादी प्रदर्शित केली जाणार नसली तरी या यादीनुसार संबंधित बालगुन्हेगारावर पाळत ठेवली जाणार आहे. गंभीर गुन्ह्य़ात सजा झालेला बालगुन्हेगार सुटून बाहेर आला का वा तो कुठे आहे, याबाबाबत माहिती ठेवली जाणार आहे.
‘शक्ती मिल’मध्ये उघडकीस आलेल्या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. २२ ऑगस्ट रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीची डोंगरीच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हयांची नोंद होती. ३१ जुलैच्या टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार प्रकरणातला आरोपी गोटय़ावर पाच गुन्ह्यांची नोंद होती. परंतु सुधारगृहातून आल्यानंतरही त्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत. बुधवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे परिषदेत या बालगुन्हेगारांवर चर्चा झाली. आयुक्तांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना या बालगुन्हेगांराच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले. ते सध्या काय करतात त्यावर लक्ष ठेवून त्यांची नोंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.