तिने आयुष्य जगताना जाणूनबुजून स्वत:भोवती तयार केलेल्या भिंती.. भिंती पलीकडील लोकांना याविषयी असणारे कुतूहल तर दुसरीकडे भिंतीच्या आत घुसमटत असलेले तिचे जगणे.. सरावाच्या या वळणावर अचानक मैत्रिणीच्या रूपाने डोकावलेला भूतकाळ.. त्यातून उलगडणारे मैत्रीचे बंध यावर भाष्य करणारे ‘कृष्णविवर’ नाटक रविवारी सायंकाळी सात वाजता कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
येथील रंगालय नाटय़ चळवळ आणि कल्याण येथील अभिनय संस्थेच्या सहकार्याने लेखक दत्ता पाटील आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘कृष्णविवर’ नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. नाटय़ निर्माता संघाची अनेक पारितोषिके या दीर्घाकाने पटकाविली असून समाजाच्या सद्य:स्थितीवर त्यात भाष्य करण्यात आले आहे. सामाजिक संक्रमणातून भावनांना नकळत चढलेला तार्किकता व बुद्धिवादाचा अहंगंड पेलून चालत असताना हे सारे खोटे असा निर्माण होणारा भास हा विचार नाटकात मांडला आहे.
ती एक पत्रकार मध्यवयीन. सौंदर्यवादाच्या पलीकडे जात सातत्यपूर्ण प्रयत्नातून तार्किकतेचा आधार घेत वैचारिकतेचा विभ्रम तयार करून बसली. तिच्या भोवताली तिनेच तयार केलेली या तार्किकतेची, कथित विचारांची एक नजरकैद आहे. एकदा अचानक १५ वर्षांनंतर तिला तिची अभिनेत्री मैत्रीण सरिता भेटते. सरिता आणि तिला खूप बोलायचे असते. आठवणींची शिदोरी वाटून घ्यायची असते. पण सरिता तिच्या वलयाला काहीशी बिचकते. ते वलय आपल्याला भेदता येईल का, असा तिचा विचार सुरू असतानाच ती सरिताच्या दुखऱ्या संवेदनाचा वेध घेताना पत्रकार असलेली ती मात्र १५ वर्षांत काय कमावले, गमावले याचा जमा हिशेब होत असताना मैत्रीण निघून जाते. या एकाकीपणाचे रूपांतर कशात होते यावर लेखक भाष्य करत आहे. वेगळ्या धाटणीच्या नाटकात दीप्ती चंद्रात्रे व नेहा अष्टपुत्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जयदीप आपटे यांची प्रकाश योजना तर विराज जयवंत यांचे संगीत आहे. दिग्दर्शन व नेपथ्य झुंजारराव यांचे आहे. नाटय़प्रेमींनी या प्रयोगास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.