चित्रपट म्हटला की पोलीस आलेच. सर्वच नटांनी धाडसी पोलिसांच्या व्यक्तिरेखा सिनेमा आणि मालिकांमध्ये रंगविलेल्या आपण पाहिल्या आहेत. परंतु खरेखुरे पोलीस कधीच चित्रपटांत दिसले नव्हते. परंतु आता लवकरच मुंबई पोलीस दलातील खरेखुरे  पोलीस मोठय़ा पडद्यावर रसिकांना पाहता येणार आहेत. मुंबई पोलिसांनी दिल्ली बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर एक फिल्म बनविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी खऱ्या खुऱ्या पोलिसांनाचा भूमिका देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
दिल्ली घटनेनंतर देशभरात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मुंबईची परिस्थितीही त्याहून वेगळी नाही. ते लक्षात घेऊन महिलांमध्ये पोलिसांबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा, पोलिसांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी आता जनजागृतीसाठी अभिनव योजना हाती घेतली आहे. त्यासाठी प्रथमच लघुपट बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या लघुपटासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनाच अभिनयाची संधी देण्याचे ठरले आहे. यासाठी बऱ्यापैकी चेहरा असणाऱ्या आणि अभिनयाची आवड असणाऱ्या पोलिसांची निवड चाचणी (ऑडिशन )गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत आयोजित करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांनी मुंबईच्या १३ उपायुक्तांना ‘अतितात्काळ’ पत्र लिहून अभिनयाची आवड असणाऱ्या पोलिसांची नावे सुचविण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवार ७ फेब्रुवारीपासून त्यांची ऑडिशनही सुरू झाली आहे.
ही बाब सध्या तरी गोपनीय ठेवल्याने दाते यांनी या फिल्मचा अधिक तपशील जाहीर करण्यास विरोध केला आहे. आधी ऑडिशन पूर्ण होऊ द्या, मग इतर सविस्तर सांगू, असे ते म्हणाले.
चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आदी तपशील अजून गुलदस्त्यातच आहे. यासाठी प्रत्येक उपायुक्तांच्या हद्दीतील पोलीस उपनिरीक्षक आणि निरीक्षकांची दोन ते तीन नावे देण्यास सांगितले आहे. हा लघुपट चित्रपटगृहात तसेच केबल वाहिन्यांवरून दाखविण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.