महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (मॅग्मो) संघटनेने सुरू केलेले काम बंद आंदोलन राज्य शासनाच्या इशाऱ्यानंतरही शुक्रवारी कायम राहिले. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यातील ७०० हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांना फटका बसला आहे. या आंदोलनास सर्व वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून शनिवारी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मागील सोमवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर मॅग्मोच्या राज्य कार्यकारणी संघटनेने आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारपासून संघटनेच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद करीत जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे. ७९२ वैद्यकीय अधिकारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य केंद्राची सेवा चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. राज्य सरकारने रुग्णांसाठी आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली असली तरी त्यासंबंधित व्यक्तींना रुग्णालय तसेच इतर काही बाबींचे संपूर्ण ज्ञान नसल्याने सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे राज्य सरकारने उपलब्ध केलेले वैद्यकीय अधिकारी कामावर रुजू होण्याऐवजी आंदोलनात सहभागी झाले. त्याचाही फटका रुग्णांना बसला.
शुक्रवारी या आंदोलनात शहर परिसरातील विविध वैद्यकीय संघटनांसह कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यात आशा, अंगणवाडीसेविका या संघटनांचाही समावेश आहे. शनिवारी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मॅग्मोचे माजी शहराध्यक्ष डॉ. प्रकाश आहेर यांनी दिली. संघटनेच्या भूमिकेमुळे रुग्णसेवा दिली जात नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र या मागण्यांसाठी तीन वर्षांपासून लढा देऊनही, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरदेखील काही हालचाल झाली नसल्याने संघटनेचा नाइलाज झाल्याचे ते म्हणाले. आंदोलन सुरू असले तरी संघटनेचे स्वयंसेवक रुग्णांना नि:शुल्क सेवा मिळावी यासाठी इतर पर्याय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुचवीत आहेत. खासगी दवाखान्याच्या मदतीने काही कामे करून घेतली जात असल्याचे आहेर यांनी सांगितले.