राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणास विरोध करण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २७) सकाळी १० वाजता पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर शिक्षकेतर कर्मचारी धरणे धरणार असल्याची माहिती शिक्षकेतर संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष निवृत्ती लोखंडे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या धोरणामुळे शिक्षकेतरांची अधीक्षक, प्रयोगशाळा परिचर व नाईक ही पदे आता शाळेत राहणार नाहीत. मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, शिपाई या पदांना कात्री लावण्यात आली आहे. चिपळणकर समितीने पूर्वी ही पदे भरली होती. यापुढेही समितीच्या शिफारशीनुसार पदे भरली जावीत व एकाकी पदांना संरक्षण द्यावे अशी संघटनेची मागणी आहे असे लोखंडे यांनी सांगितले.
सुधारित आकृतिबंधानुसार शिक्षकेतर कर्मचा-यांची पदे ही मागील निकषाप्रमाणे तुकडीच्या संख्येवर न देता ती विद्यार्थिसंख्येवर दिली गेली आहे. त्यामुळे शाळा व संस्थांचे नुकसान होत आहे. शिक्षकेतर कर्मचा-यांची भरती १० वर्षांत झालेली नाही. यापुढे नवीन भरती करता येणार नाही अशी उपाययोजना सुधारित आकृतिबंधात राबविली आहे. त्यामुळे सुधारित आकृतिबंध रद्द करून चिपळूणकर समितीची अंमलबजावणी करावी, शाळा तेथे ग्रंथपाल असावा, निवडश्रेणी व वेतनवाढ मिळावी, शिपाई कर्मचा-यांना मासिक पगारातच धुलाईभत्ता मिळावा आदी मागण्यांसाठी धरणे धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.