लहानपणापासून बचतीचे संस्कार मुलांमध्ये रुजावे, त्यांना योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन करता यावे आणि या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातून कसे होतात हे समजावे यासाठी जिल्हा परिषद व लोकविकास सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीन शाळांमध्ये ‘आमची बँक, आमचे एटीएम’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यातून अन्य उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
लोकविकास संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्याच्या उद्देशाने आरोग्य, खेळ, उद्योजकता, पर्यावरण, बचत याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव व शिक्षक शरद तोत्रे यांच्या पुढाकाराने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विनायकनगर, गणेशगाव पाडा या ठिकाणी संस्थेने ‘आमची बँक, आमचे एटीएम’ ही संकल्पना रुजवली. मुलांना आर्थिक व्यवहार कसे चालतात, यासाठी प्रत्यक्ष बँकेस अभ्यास भेट देत बँकेतील खात्यांचे प्रकार, कर्ज कसे मिळते, बचत कशी करतात, एटीएमच्या साहाय्याने पैसे कसे काढता येतील याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येते. अभ्यास भेटीनंतर मुलांना खाऊ म्हणून मिळणारे पैसे, वर खर्चाला मिळणारे पैसे, ‘कमवा आणि शिका’ उपक्रमातून मिळणारे काही पैसे यांची बचत कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन करत बँकेत खाते उघडण्याचे आवाहन केले जाते. संस्थेच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आज शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे शाळेच्या बँकेत खाती आहेत. तर मुलांकडे स्वत:च्या नावाचे ‘एटीएम कार्ड’. बँक खात्यात पैसे भरण्यासाठी मुले चॉकलेटसाठी मिळणाऱ्या एक रुपयापासून खाऊच्या १०० रुपयांपर्यंतचा वापर करतात. हा व्यवहार कधी दिवसाला तर कधी प्रत्येक शनिवार, रविवारची चंगळ व्हावी यासाठी सुरू राहतो. शाळेकडे विद्यार्थ्यांच्या बचतीतून आतापर्यंत आठ हजार रुपये जमा झाले आहेत. हा संपूर्ण व्यवहार शाळेचा अर्थमंत्री पाहतो. विद्यार्थ्यांची खाती तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिली जाते.
विद्यार्थी या पैशांचा वापर जेव्हा गरज पडेल तेव्हा म्हणजे वह्य़ा, पुस्तके, रंगपेटी असे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी करतात. तसेच एखादा अनपेक्षित खर्च असल्यास बँकेतून कर्जदेखील उपलब्ध केले जाते. बऱ्याचदा पैसे खर्च करूनही काही बचत शिल्लक राहते अशा वेळी वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांना बचतीतून शैक्षणिक सहल घडवून आणली जाते. भारतीय संस्कृती, इतिहास आदींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच मुलांना पालकांना तोशिस भासू न देता स्वखर्चाने सहलीचा आनंद घेता यावा हा त्यामागील उद्देश. आतापर्यंत बँकेचे खातेधारक विद्यार्थ्यांनी मंत्रालय परिसर, अजिंठा, देवगिरी, मुंबई येथील तारांगण, विविध बँका आदी ठिकाणी भेट दिली आहे.

चारुशीला कुलकर्णी, नाशिक