पाश्चात्य जगाला कधीही संस्कृती नव्हती. आज आपण ज्याला पाश्चात्य संस्कृती म्हणतो ती केवळ जीवन शैली आहे. आपल्या परंपरेत कधी काय खावे, खाऊ नये याचा विचार केला होता. पाश्चात्य वा आधुनिक वैद्यकशास्त्रात सर्व रुग्णांना रोगानुसार एकच औषधयोजना केली जाते. तेथे होणारे संशोधन हे मुख्यत: औषध व तेल कंपन्यांच्या पैशाने होते. या कंपन्यांच्या प्रयोगातून आलेले निष्कर्ष आपण भारतीयांनी मानायची गरज नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विख्यात शल्यविशारद डॉ. रवी बापट यांनी वसई येथे केले.
वसई येथे ‘जागरूक नागरिक संस्था’ आणि ‘सुविचार प्रसार मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपली संस्कृती आपले आरोग्य’ या विषयावर प्रकट मुलाखतीत डॉ. बापट बोलत होते. लेखिका वीणा गवाणकर यांनी डॉ. बापट यांच्याशी संवाद साधला.  डॉ. बापट म्हणाले की, आपल्या आयुर्वेदाचार्यानी ऋतुमान आणि प्रकृतीनुसार उत्तम आरोग्य राखण्यासाठी काय करावे, काय करू नये आणि काय खावे व काय खाऊ नये याचा सखोल विचार केला. पाश्चात्यांच्या संशोधनातून अमूक तेल हृदयास चांगले किंवा अमुक औषध तमूक रोगाला प्रतिबंध करेल म्हणून ते घ्या, असे निष्कर्ष सांख्यिकी प्रयोगातून काढले जातात. हे निष्कर्ष आपण भारतीयांनी प्रमाण मानायची गरज नाही.
आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी वेडय़ावाकडय़ा डाएटिंगच्या मागे न लागता प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास आपल्याला झेपेल आणि जमेल असा व्यायाम करण्यास पर्याय नाही. उत्तम आरोग्य व स्नायूंच्या बळकटीसाठी चालणे, सायकल चालविणे, योगासने, व्यायामशाळेत जाऊन वजन उचलण्याचा व्यायाम करावा, असा सल्लाही डॉ. बापट यांनी या वेळी दिला.प्रास्ताविक मेल्विन डिसुझा यांनी केले. तर डॉ. बापट यांचा परिचय प्रा. शोभा बागूल यांनी करून दिला. कौस्तुभ राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फॅमिली डॉक्टरांची ‘कट’वणूक!
पूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ ही संस्था कुटुंबाचाच एक घटक होती. सहसा त्यांच्या सल्ल्यानेच जुजबी औषधोपचार व विश्रांतीने बहुतांश आजार बरे व्हायचे. आज मात्र साध्या साध्या गोष्टींसाठी रुग्ण थेट सुपर स्पेशालिस्टकडे धाव घेतात आणि त्यांच्या सल्ल्याने अनावश्यक चाचण्या करून आपला पैसा आणि वेळ फुकट घालवितात. आज जे काही फॅमिली डॉक्टर उरले आहेत त्यांना ‘जीपी’ म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्स म्हणण्याऐवजी ‘जीपीओ’अर्थात जनरल पोस्ट ऑफिस म्हणावेसे वाटते. जे ‘कट’ मिळविण्यासाठी आपल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी तसेच विविध चाचण्या करणाऱ्या केंद्रांकडे पाठवितात, असा शालजोडीतील टोला डॉ. रवी बापट यांनी हाणला.