हा पक्षी असाच का दिसतो..! याचे नाव असेच का..! इतके सारे पक्षी आपल्याकडे आहेत..! प्रत्येक पक्ष्यांबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा आणि एखाद्या पक्ष्याविषयी माहिती असेल तर त्याविषयी सांगण्याची उत्सुकता! अशी सारी धावपळ सुरू होती ती ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शनातील एका छताखाली. चार दशकाहून अधिक काळ पक्ष्यांचा अभ्यास करणारे पक्षीनिरीक्षक सुरेंद्र अग्निहोत्री आणि गेल्या चार-पाच वर्षांंपासून त्यांच्यासोबत पक्षीनिरीक्षणासह अभ्यास करणारे पक्षीनिरीक्षक अविनाश लोंढे यांनी विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या भरवलेल्या या कार्यशाळेत गेल्या दोन दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांची सैर सुरू आहे.
नागपूर आणि आसपासच्या परिसरात सातत्याने नवीन आणि असामान्य पक्ष्यांची नोंद येथील पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. निवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या बाबतीत या शहर आणि परिसराने रेकॉर्ड केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आययुसीएनच्या लाल यादीत संकटग्रस्त पक्ष्यांची यादी वाढत असतानाच नागपूर आणि परिसरातील पक्षीवैभव जपण्याचे कार्य गेल्या काही वषार्ंपासून येथील पक्षीनिरीक्षक करीत आहेत. ही संख्या शतकी असली तरी त्यातील काहींनी मात्र खरोखरीच हे पक्षीवैभव जपण्याचा प्रयत्न केला आहे. छायाचित्रांपुरते पक्षीनिरीक्षण न करता त्याची नोंद, त्याचा अभ्यास, जुन्या पक्ष्यांच्या यादीशी त्याची जुळवणी, असे सारे काही सुरू आहे. अंबाझरी बॅक वॉटर, मिहान परिसरातील तेल्हारा आणि दहेगाव तलाव, देगमा जंगल, वेना प्रकल्प, गोरेवाडा, तेलंगखेडी, उमरेड रोडवरचे पारडगाव, खापरी, सोनेगाव, लोहारा जंगल, कोराडी तलाव, अशा अनेक ठिकाणी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. तत्कालीन आणि ज्येष्ठ पक्षीनिरीक्षकांच्या अभ्यासानुसार ४७० पक्ष्यांची नोंद नागपूर आणि परिसरात करण्यात आली आहे. मात्र, नव्या पक्षीनिरीक्षकांनी छायाचित्रांच्या माध्यमातून सुमारे ३०० पक्ष्यांची नोंद केली आहे. एकटय़ा उमरेड मार्गावरील १५-१६ तलावांवर भरपूर आणि दुर्मीळ पक्षीवैभव अनुभवायला मिळते. याचा साक्षीदार प्रत्येकजणच होईल, असे नाही आणि प्रत्येकालाच ते निरीक्षण जमेल, असेही नाही. म्हणूनच ‘आपली वसुंधरा’ च्या सुरेंद्र अग्निहोत्री आणि अविनाश लोंढे ही संपदा छायाचित्रांच्या माध्यमातून चिमुकल्यांसह ज्येष्ठांसाठीसुद्धा मांडली.
नागपूर आणि विदर्भाचा परिसर पक्ष्यांच्या जैवविविधतेबाबत समृद्ध आहे. ते या प्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहे. पक्षीसंवर्धनातून निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवला जाऊ शकतो. पक्ष्यांचे निरीक्षणच करायचे असेल तर सोबतच शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासही करणे तेवढेच आवश्यक आहे.
पहिल्याच दिवशी पाचशेवर विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे हे जग अनुभवले. मात्र, सर्वाधिक आनंदाचा क्षण ठरला तो मुकबधिर विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटीचा. त्यांना खूप काही विचारायचे आहे, असे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते.
हाताखुणांची भाषा संयोजकांनाही येत नसल्याने तेही हतबल झाले होते. दुर्मीळ माळढोक, सारस, कॉमन क्रेन, मोटल्ड वुड आऊल, युरोपियन नीळकंठ, राजगिधाड, पांढऱ्या पाठीचा गिधाड, अशा रंगबिरंगी पक्ष्यांच्या छायाचित्रांवरून त्यांची बोटे लिलया फिरत होती. तब्बल ७३ पक्ष्यांची ही दुनिया सलग दुसऱ्या दिवशीही अनेक शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवली.