राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये
२६ जानेवारीला दरवर्षी झेंडावंदनासाठी नियमितपणे महाविद्यालयात जातो. या दिवशी झेंडावंदन तसेच राष्ट्रगीत गायन, ध्वजसंचलनअशा कार्यक्रमांत प्रत्येकाने  सहभागी व्हावे. सुट्टी आहे म्हणून उगाचच वेळ वाया न घालवता सुट्टी सत्कारणी लावावी. राष्ट्रीय / सामाजिक विषयांवर चर्चा करावी. या दिवशी अनेक जण उत्साहाने प्लास्टिक किंवा कागदाचा राष्ट्रध्वज विकत घेतात. पण नंतर त्याचे योग्य ते पावित्र्य राखले जात नाही. रस्त्यावर किंवा अगदी कुठेही हे ध्वज पडलेले असतात. त्यामुळे एकतर असे ध्वज विकत घेऊच नयेत. घेतले तर त्याची विटंबना होणार नाही, याची काळजी घ्यावी. नाहीतर छोटे ध्वज शर्टाला लावून नंतर व्यवस्थित काढून ठेवावेत.
– विभव गळदगेकर, ठाणे, द्वितीय वर्ष बीएमएस, जोशी-बेडेकर महाविद्यालय

सामाजिक भानही ठेवतो

सहा दिवस सतत काम केल्यानंतर आठवडय़ातून एखादा दिवस अशी सलग सुट्टी मिळाली तर नुसता आराम किंवा टाइमपासच करतो असे नाही. आम्ही मित्र बाईकवरून शहरापासून दूर जाण्याचा बेत आखतो किंवा एखादा ट्रेक करतो. समाजात घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांवरही आमच्यात चर्चा                होते. आमच्यातील प्रत्येकाला सामाजिक भान आहे. त्यामुळे समाजासाठी आपल्याला काही करता करता येईल का, त्याावरही चर्चा होतात. आम्ही मित्र दर माहिन्याला तीनशे रुपये जमा करतो. मोठी रक्कम जमा झाली की त्यातून डोंबिवलीतील ‘जननी आशिष’ या संस्थेसाठी त्यांना आवश्यक अशा वस्तू, साहित्य त्यांना देतो. एखाद्या महिन्यात ज्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी किंवा २६ जानेवारी वा एखाद्या सुट्टीच्या दिवशी आम्ही हे काम करतो. खिडकाळीजवळच्या ‘साईधाम’ वृध्दाश्रमासही भेट देतो. आमचे परिचित, नातेवाईक यांनाही या दोन्ही संस्थांविषयी माहिती देऊन काही मदत करण्याविषयी सांगतो.
– रोहन तारे, डोंबिवली, बीई(इलेक्ट्रॉनिक्स), सॉफ्टवेअर ट्रेनी

‘संपूर्ण वंदे मातरम’ची संधी

गेली चार वर्षे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री आम्ही मित्र चतुरंगची सवाई एकांकिका स्पर्धा पाहण्यास जात आहोत. रात्रभर एकांकिकेचे खेळ रंगतात. पहाटे कधीतरी स्पर्धा संपते. त्यानंतर आयोजकांच्या वतीने ‘वंदे मातरम’ सादर केले जाते. ‘संपूर्ण वंदे मातरम’ ऐकण्याची ही संधी वर्षांतून एकदाच मिळते. त्यामुळे त्याचे खूप अप्रूप वाटते. त्यानंतर आम्ही मित्र आमच्या महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जमतो. कॉलेज सोडून दोन वर्षे झाली आहेत. पण, आम्ही नेमाने २६ जानेवारीच्या सकाळी महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला जात आहोत. याही वर्षी यात खंड पडू देणार नाही.
– विवेक सुर्वे, बीएमएस, शैलेंद्र महाविद्यालय, फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी

हा दिवस वाया घालवायचा नाही

प्रजासत्ताक दिनी सकाळी लवकर उठायचं आणि दूरचित्रवाणीवर संचलनाचा सोहळा पाहायचा, हाच आजवरचा क्रम होता. पण, नुकत्याच आलेल्या एका अनुभवानं काहीतरी वेगळे करावे असे मला वाटू लागले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसमवेत वाघा बॉर्डरवर जाण्याची संधी मिळाली. तेथे संचलनाला दोन्ही देशांतून मोठी गर्दी जमते. धो-धो पाऊस होता. तरीही भारताकडची बाजू संचलन पाहण्यासाठी आलेल्यांनी भरून गेली होती. याउलट पलीकडे पाकिस्तानच्या बाजूला काही शालेय मुलांना आणून बसविण्यात आले होते. भारतीय जवानांनी केलेल्या संचलनाला जितका उत्स्फुर्त प्रतिसाद भारतीयांकडून मिळत होता त्याच्या तसूभरही तिकडे नव्हता. आपल्यातल्या भारतीयत्वाची जणू नवी ओळख मला तिथे मिळाली.  या दिवशी असे काही करायचे आहे की ज्याच्या स्मृती वर्षभर राहतील.
अपूर्वा तायडे, विद्यार्थिनी, व्हीजेटीआय