लाखोंची थकबाकी
तुम्ही मुंबईतील १० बाय १२च्या खोलीत राहत आहात आणि बेस्टचे विजेचे बिल थकवले आहे? बेस्टचे अधिकारी तुमच्या दारी येऊन तातडीने तुमची वीज तोडतील. मात्र याच मुंबई शहराच्या पोलीस आयुक्तालयाने, तहसीलदार कार्यालयाने, महाराष्ट्र राज्याच्या अवर सचिव थकवलेली १०-१५ लाखांची बिले मात्र बेस्टच्या खिजगणतीतही नसल्याची बाब बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत समोर आली. इतकेच नव्हे तर सरकारी, निमसरकारी आणि खासगी अशा विविध प्रकारच्या वीज ग्राहकांनी तब्बल १३ कोटींपेक्षा जास्त रकमेची वीज बिले थकवलीच्या माहितीही बैठकीत समोर आली.
समितीच्या बठकीत रवि राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा वीज कंपनीकडून बेस्टला वीज विकत घेताना आधी पसे द्यावे लागतात. मात्र ही वीज सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सरकारी कार्यालयांची, काही खासगी कार्यालयांची, रुग्णालयांची वीज बिले गेले अनेक महिने थकलेली आहेत. यात पोलीस आयुक्तालय, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, राज्याचे अवर सचिव, मुंबईचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर कार्यालयांचा समावेश आहे. याबाबतची कागदपत्रे राजा यांनी समितीसमोर सादर केली. याबाबत संशोधन करून उत्तर देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
या कागदपत्रांनुसार मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाचे अंदाजे १.८० कोटी, शहर दिवाणी न्यायालयाचे रजिस्ट्रार यांचे १.३७ कोटी, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता यांचे २.०८ कोटी एवढी रक्कम थकीत आहेत. यातील काही कार्यालयांनी तब्बल ५० महिने वीज बील पूर्ण भरलेले नाही. विविध सरकारी व निमसरकारी कार्यालयांनी थकवलेल्या बिलाची एकूण रक्कम ६.७७ कोटींपेक्षा जास्त आहे. यात प्रामुख्याने विविध परिमंडळांमधील पोलीस उपायुक्तांची कार्यालये, कामा व आल्ब्लेस रुग्णालय, जीटी रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. दोनशे-तीनशे रुपयांची वीज बिले थकवणाऱ्या सर्वसामान्य लोकांची वीजजोडणी तातडीने कापली जाते. बेकायदेशीर जोडणी घेणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र येथे उच्चपदस्थ बेस्टला लुटत असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न राजा यांनी उपस्थित केला. राजा यांच्या मुद्दय़ाचे समर्थन करताना याकुब मेमन व शिवजी सिंह यांनीही बेस्ट प्रशासनावर ताशेरे ओढले.