या वर्षांच्या सुरुवातीला सायबर तज्ज्ञांनी शोधून काढलेल्या ‘हार्टब्लीड’ या बगमुळे अँड्रॉइड आणि विंडोज प्लॅटफॉर्मवर ‘मालवेअर्स’ची संख्या वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीतील झालेल्या एका पाहणीत अँड्रॉइडमध्ये तब्बल चार लाख मालवेअर्स आढळल्याचे दिसून आले आहे. हे सर्व मालवेअर्स ‘हार्ट ब्लीड’च्या माध्यमातून पसरविण्यात आल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
जानेवारी ते मार्च या तिमाहीत ‘ओपन एसएसएल’मध्ये शिरकाव केलेल्या ‘हार्ट ब्लीड’ या व्हायरसचा शोध लागला खरा. पण या व्हायरसमुळे अनेक सायबर गुन्हेगारांना सामान्यांच्या मोबाइलमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली. यामुळे या कालावधीत एकटय़ा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चार लाख मालवेअर्स आढळून आले. यातील ८९ टक्के मालवेअर्स हे अँड्रॉइड अ‍ॅडवेअरचे आहेत. अँड्रॉइडच्या असुरक्षित मार्केटमुळे सायबर गुन्हेगारांना मालवेअर्स सोडणे शक्य होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मोबाइल, टॅबलेट किंवा इतर कोणत्याही अँड्रॉइड फोनमध्ये वापरकर्ते इन्स्टॉल करत असलेल्या मोफत अ‍ॅप्लिकेशन्समधून अँड्रॉइड अ‍ॅडवेअरचा प्रवेश होतो. यातील बहुतांश अ‍ॅप अनधिकृत आणि तृतीय स्रोतांकडून आलेली असतात आणि त्यावर नियंत्रण व नियमन नसते. असे गोपनीय अ‍ॅडवेअर गोपनीय माहिती चोरत असल्याने वापरकर्त्यांना सहसा डिटेक्ट होत नसल्याने ते अतिशय धोकादायक ठरतात, अशी माहिती ‘क्विक हील’ या अँटिव्हायरस कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अनेक बनावट अ‍ॅप आपण मोबाइलवर वापरत असलेल्या सोशल नेटवर्किंग साइट्समधील वैयक्तिक तपशील काढून घेणे असे प्रकार करत असतात.

मालवेअर म्हणजे काय?
मोबाइलमधील आपल्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून काही बग्ज सोडले जातात. याचा वापर करून आपल्या फोनमधील माहिती चोरली जाते. हे सर्व आपल्या नकळतपणे होत असते. या माहितीचा गैरवापर कंपन्या विविध प्रकारे करू शकतात.

विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही या तिमाहीत एक कोटी मालवेअर्स आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘हार्ट ब्लीड’चा सर्वात मोठा फटका या ऑपरेटिंग सिस्टिमला बसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. ‘हार्ट ब्लीड’मध्ये पासवर्ड चोरण्यात आले असून ५० टक्के वापरकर्त्यांनी अद्याप पासवर्ड बदलले नसल्याचेही अहवालात नमूद केले आहे. सायबर गुन्हेगारांचे मुख्य उद्देश हा माहिती चोरणे हा असतो. यासाठी ते नानाविध मार्ग शोधत असल्याचे क्विक हील टेक्नॉलॉजीचे तंत्रज्ञान संचालक संजय काटकर यांनी स्पष्ट केले.