लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करून जिल्हा प्रशासनाने ११० गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश काढल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात तसे आदेश निघालेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचाच फायदा घेत शेख हाजी शेख सरवर सारख्या गुंडांनी हैदोस घातल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात गेल्या १० एप्रिल रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा पोलीस दलाने जिल्हय़ातील ११० गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींचे हद्दपारीचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी व जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. यात हद्दपारीच्या ४० जुन्या प्रकरणांचा तर ७० नवीन प्रकरणांचा समावेश होता. त्यातही चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राजू भुजबळ यांनी चंद्रपूर उपविभागातील ३१ गुन्हेगारांचा समावेश होता. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक करीमुद्दीन करीमलाला शिराजुद्दीन काझी व शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्यासह घुग्घुस येथील तिरुपती पॉल हत्याकांडातील मुख्य आरोपी शेख हाजी शेख सरवर याचा समावेश होता.
प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक झाली तरी हद्दपारीचे हे आदेश निघालेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचाच परिणाम शेख हाजी शेख सरवर याने घुग्घुस शहरात येऊन धुमाकूळ घातला असल्याने सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. गेल्या रविवारी शेख हाजीने घुग्घुस शहरात येऊन वाहतूक व्यवसायिकावर गोळीबार केला. तेव्हापासून शेख हाजी फरार आहे. काही दिवसांपूर्वी हाजी चंद्रपूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर तो घुग्घुस शहरात परत आला. आता पॉल हत्याकांडाचा धाक दाखवित त्याने स्थानिक कोळसा व्यापारी, उद्योजकांना धमकावने सुरू केले आहे. या परिसरात व्यवसाय करायचा असेल तर हफ्ता द्यावा लागेल अशी धमकीच त्याने दिली असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. पॉल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार चिन्ना तगरम (३५) व सुषमा तरगम (३०) यालाही शेख हाजीने धमकावले होते. त्यातूनच या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची किंवा त्यांची हत्या झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा मागोवा घेतला असता व हद्दपारीच्या आदेशानंतरही हाजी शहरात आलाच कसा याची माहिती जाणून घेतली असता त्याच्या हद्दपारीचे आदेश निघालेच नव्हते, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी लोकसत्ताला दिली.
चंद्रपूर उपविभागातील ३१ गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव आपल्याकडे आला होता. परंतु या प्रकरणात साक्षी पुरावे झाले नसल्याने त्यांच्या हद्दपारीचे आदेश काढण्यात आले नव्हते, असेही त्यांनी सांगितले. आता या सर्व प्रकरणात सर्वाचे बयान घेऊन चौकशी केल्यानंतरच आदेश काढले जातील असेही त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी दैने यांनी वस्तुस्थिती सांगितली असताना जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी लोकसभा निवडणुकीला दोन दिवसाचा अवधी असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत ४० जुने व नवीन ७० अशा ११० गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती दिलीच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत गुन्हेगारांना तडीपार करावे असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. आयोगाचे निर्देश असताना ११० गुन्हेगारांच्या हद्दपारीचा आदेश असताना तसे आदेश निघालेच कसे नाही याबाबत आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.